लातूर /प्रतिनिधी :महाराष्ट्राच्या स्त्री चळवळीचा इतिहास विद्याताईंच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. त्यांच्या जाण्याने ही चळवळ पोरकी झाली ,अशा शब्दात भारतीय स्त्री शक्ती संघटनेने विद्याताई बाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली .
भारतीय स्त्री संघटनेच्या राष्ट्रीय सचिव कुमुदिनी भार्गव यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की ,विद्याताईंच्या जाण्याने महाराष्ट्रातील सर्वच कार्यकर्त्या निशब्द झाल्या . सामान्य महिलांना आपल्या स्त्री असण्याच्या सार्थकतेचा स्वीकार करण्याची मानसिकता तयार कारण्यापासून त्यांच्या जीवनाला उर्जित अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपले जीवन वेचले . त्यांच्या विचारातील स्पष्टता , संवाद साधण्याची क्षमता , कार्याचा उरक , दूरदृष्टी , महिलांचे प्रश्न सोडविण्याची मनापासूनची तळमळ ,सजग लेखणी , प्रवाहाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचे धैर्य अतुलनीय होते .
स्त्री मासिक , मिळून साऱ्याजणी , त्यांचे प्रकाशित लेख व पुस्तकातून त्यांनी सातत्याने स्त्री सामर्थ्याचा जागर केला . प्रत्येक स्त्रीला स्वतःची ओळख व्हावी , क्षमता समजावी हा त्यांचा ध्यास होता . त्यांच्या विचारातील खोली नेहमीच मनाला चालना देत असे.स्वतःचे म्हणणे मांडताना किंवा कार्य करताना कुठलाही अभिनिवेश न आणता शांत व ठामपणे जोपासलेल्या त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर वाटत असे . त्यांच्या वर्तणुकीतून उत्तम कार्यकर्त्यांचा आदर्श समोर येत असे . त्यांनी पेरलेली ऊर्जा त्यांच्या तालमीत घडलेल्या कार्यकर्त्यांच्या रूपाने कार्यरत राहील यात शंकाच नाही . विद्याताईंच्या जाण्याने संघटना व्यथित आहे ,अशा शब्दात कुमुदिनी भार्गव यांनी आपल्या भावना प्रकट केल्या आहेत .