लातूर (प्रतिनिधी):-नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध दर्शविण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला आज लातूर व निलंगा येथे चांगला प्रतिसाद मिळाला. लातूर येथे सुमारे ४० ते ४५ कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदमध्ये आज लातूर शहरात विशेषतः गोलाई परिरात चांगला प्रतिसाद मिळाला. या परिसरातील दुकाने, हॉटेल, व्यापार, बाजार समिती, पेट्रोल पंप हे बंद होते. लातूर शहरातील गांधी चौक, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बर्यापैकी बंद होता. शिवाजीनगर, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आजच्या या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदचे अवाहन करणार्या ४० ते ४५ कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आले. दुपारनंतर मात्र, लातूर शहरातील बहुतेक व्यवहार सुरळीतपणे चालू झाले. निलंगा शहरात मात्र बंद कडकडीत पाळण्यात आला. दुकाने, व्यापार, आस्थापना, बाजार, एस. टी. बसेस, ऑटो सर्व काही बंद होते. दुपारी ३ वाजता निलंगा शहरात मोर्चा काढण्यात येणार आहे. निलंगा येथील बंदला कॉंगेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांनीही पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले.
नागरिकत्व कायदाविरोधात लातूर बंदला प्रतिसाद