महिला मजूराचा जिल्हा कचेरीवर तिसर्‍यांदा सत्याग्रह..

मुख्यमंत्र्यांना दिले अखेर आत्महत्येचे निवेदन?


लातूर,दि.३०ः महाराष्ट्र  शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने,आयुक्त समाजकल्याण यांना अन्यायग्रस्त मजूर महिलेस पूर्ववत कामावर घेण्याचे लेखी आदेश देवूनही,लातूर येथील समाज कल्याण कार्यालयाने न्याय न दिल्यामुळे अनिता बेले या मजूर महिलेने दि.३० जानेवारी २०२० पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिसर्‍या टप्प्यातील आपला बेमुदत सत्याग्रह सुरु केला असून, सदर शासन आदेशाची तात्काळ न्याय अंमलबजावणी नाही झाली तर सत्याग्रह स्थळी आपण जाहीर आत्मदहन करु, अशा लेखी इशार्‍यांचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री,सामाजिक न्याय मंत्री ,पालकमंत्री व जिल्हाधिकारी,लातूर यांना रितसर सादर केले आहे.
शेणी,ता.अहमदपूर येथील मागासवर्गीय कष्टकरी महिला अनिता दत्तात्रय बेले या अहमदपूर येथील मुलींच्या शासकीय वसतीगृह आणि अनुसूचीत जाती मुलांच्या शासकीय निवासी शाळा वसतीगृहामध्ये ,दि.१ मे २०१५ पासून निश्‍चित मजूरीवर, सफाई कामगार म्हणून काम करत आहेत.मात्र परवा त्यांना संबंधित अधीक्षकांनी विनाकारण व मनमानीने, बेकायदेशीरपणे,जबरदस्तीने कामावरुन कमी केलेल्या अनिता बेले यंाना केवळ सनातन आकसापोटी काढण्यात आले आहे, सदर ठिकाणी पुरेसे पूर्ववत काम  उपलब्ध असताना आणि उर्वरित व इतर नवे लोक तेथे काम करत असतानाही, अनिता बेले  यांच्यावर सक्तीने उपासमार लादली गेली. या अन्यायाविरुध्द त्या गेली सात महिने सनदशीर मार्गाने न्याय मागत आहेत. आजपर्यंत त्यांनी शासन व वरिष्ठ प्रशासनास, भक्कम पुराव्यासह ९ स्वतंत्र निवेदने दिली आहेत. तर त्यांनी या दरम्यान, तब्बल ३३ दिवसांचे आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन केले आहे.यापूर्वी विभागीय महसूल आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना वेळोवेळी १० लेखी पत्रे दिली आहेत. तरीही अनिता बेले यांना काही न्याय मिळाला नाही.
 दरम्यान,महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने,सदर प्रकरणी विशेष लक्ष घालून समाज कल्याण आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी लातूर यंाना दि.२१ डिसेंबर २०१९ रोजी तातडीने लेखी आदेश पत्र देवून, योग्य ती त्वरीत कार्यवाही करुन, शासनास उलट टपलाी अहवाल कळविण्यास सूचविले आहे. त्यासही महिला उलटून गेला,तरीही, संंबंधित कार्यालयाने काहीही हालचाल केली नाही.
त्यामुळे अन्याग्रस्त अनिता बेले यांनी शासनाच्या सदर आदेशपत्राची तत्काळ अंमलबजावणी करुन, कायदेशीर न्याय द्यावा या मागणीसाठी पुन्हा आपल्या सत्याग्रहाच्या तिसर्‍या टप्प्यात लातूर जिल्हा कचेरीसमोर दि.३० जानेवारी २०२० पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.आणि न्यायासाठी आपणास टाळाटाळ झाली तर, या दरम्यान सदर ठिकाणी आपण कोणत्याही क्षणी जाहीर आत्मदहन करणार, असा लेखी इशाराही त्यांनी सदर निवेदनामध्ये दिला आहे.
अन्यायग्रस्त अनिता बेले यांच्या सदर सनदशीर सत्याग्रहास रामकुमार रायवाडीकर, संजय व्यवहारे, गणपतराव तेलंगे, शाम वरयाणी, सुरज पाटील, अगंदराव कांबळे, प्रा.सुधीर अनवले, वलीसाहेब शेख, ऍड.डी.एन.भालेराव, बाबूराव झाकडे, रामदास ससाणे, प्रा.दिनकर कांबळे आदि कार्यकर्त्यांनी सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.