नियोजन समितीच्या निधीतून सर्वसामान्य लोकांना विकासाचा लाभ मिळाला पाहीजे -पालकमंत्री

         लातूर,दि.२४ :- जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ अंतर्गत सर्वसाधारण योजना १९३ कोटी २६ लाख, विशेष घटक योजना १११ कोटी ३१ लाख ६० हजार व आदिवासी उपयोजना ३ कोटी ७ लाख २९ हजार  असे एकूण ३०७ कोटी ६४ लाख ८९ हजाराच्या प्रारुप आराखडयास वैद्यकीय शिक्षण  व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीने मान्यता प्रदान केली. तसेच जिल्हा नियोजन समितीकडून विविध शासकीय यंत्रणांना विकासात्मक योजना राबविण्यासाठी जो निधी दिला जातो, तो निधी संबंधित योजनांवर खर्च करण्याची गांभीर्यपूर्वक दक्षता घ्यावी व विकास योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश ही त्यांनी दिले.
                 जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. देशमुख बोलत होते. यावेळी संसदीय कार्य, पर्यावरण, भूकंप पुर्नवसन, रोजगार हमी योजना, पाणी पुरवठा व स्वच्छता व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे,खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत ,महापालिका आयुक्त एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे , जिल्हा नियोजन अधिकारी एम.एस. दुशिंग, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांच्यासह सर्व समिती सदस्य , विभाग प्रमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते.
                 पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ च्या प्रारुप आराखडयात सर्व लोक प्रतिनिधी व समिती सदस्यांनी मौखिक व लेखी स्वरुपात दिलेल्या सूचना व केलेल्या मागण्यांचा समावेश करुन सर्व समावेशक प्रारुप आराखडा सादर करावा. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० सर्वसाधारण अंतर्गत आजपावेतो झालेला खर्च कमी असून सर्व यंत्रणांनी विहीत  वेळेत खर्च करावा. हा निधी खर्च न करणे म्हणजे जिल्हयातील सामान्य माणसांवर अन्याय करण्यासारखं आहे. त्यामुळे याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन निधी खर्च करुन सर्वसामान्य लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
                 राज्य शासनाने बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना पुर्नजीवित  करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जिल्हयातील एक ही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने  घ्यावी. तसेच लातूरसह जिल्हयातील सर्व शहरांचा पाणी पुरवठा सुरळित असला पाहीजे. लातूर शहराला उजनी धरणातून पाणी देण्याबाबत शासन स्तरावर विचार सुरु असून याकरिता तयार करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची व्यावहारिकता जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने तपासावी, अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली.
                 मागील पाच वर्षात निधी वाटपात असमतोल झाला असल्याचे संसदीय कार्य राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगून पुढील काळात समप्रमाणात निधी वाटप व्हावे. तसेच निधी न मिळालेल्या ठिकाणी निधीचे वितरण करावे, त्याप्रमाणेच उदगीर येथे एक सांस्कृतिक सभागृह  व क्रीडा संकुल निर्माण करण्याची मागणी तसेच उदगीर येथील गुरु हावगी स्वामी यात्रेनिमित्त भरणार्‍या पशुप्रदर्शनासाठी  वाढीव निधी ही मिळावा असे त्यांनी सूचित केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे ,खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार सर्वश्री विक्रम काळे, बाबासाहेब पाटील व धीरज देशमुख यांनी  ही आपल्या सूचना मांडल्या.
                 प्रारंभी  जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० सर्वसाधारण अंतर्गत मंजूर निधी  २३२ कोटी असून १४२ कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या असून ९४ कोटी निधीचे वितरण झालेले आहे तर त्यातील ९० कोटीचा निधी  मंजूर योजनांवर खर्च झालेला  आहे.त्याप्रमाणेच विशेष घटक योजना १२१ कोटी मंजूर असून ७० कोटी खर्च झालेले आहेत. तर आदिवासी उपयोजनांतर्गत ३ कोटी ७६ लाखापैकी ७७ लाखाचा निधी खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.
                 त्याप्रमाणेच जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ अंतर्गत प्रारुप आराखडयासाठी  सर्वसाधारण योजनेसाठी १९३ कोटी २६ लाखाची  वित्तीय मर्यादा आली असून त्याप्रमाणे प्रारुप आराखडा तयार केला आहे. तर विशेष घटक योजनेसाठी यंत्रणांची  मागणी  १११ कोटी ३१ लाख ६० हजाराची आहे. तर आदिवासी उपयोजनेंर्तगत  ३ कोटी ७ लाख २९ हजार असा प्रारुप आराखडा तयार करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.
नवीन सभागृहाचे उद्घाटन व वृक्षरोपण :-
                 प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या अद्यावत सभागृहाचे नामफलक अनावरण व फीत कापून उद्घाटन पालकमंत्री अमित देशमुख, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री देशमुख व संसदीय कार्य राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले.
                 या नियोजन समिती सभेचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी एम.एस. दुशिंग यांनी केले तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी मानले.