बालकांच्या गुणात्मक वाढीबरोबरच भावनिक वाढ होणे गरजेचे- प्राचार्य बळीराम चौरे

लातूर- शिक्षकांचे मूल्य समाजात खूप मोठे असल्याने त्यांनी बालकांच्या शैक्षणिक गुण वाढीबरोबरच त्यांची भावनिक वाढ करणेसाठी तंत्रस्नेही व टेक्नोस्नेही बनून त्याचा वापर  शैक्षणिक अध्ययन अध्यापणात करावा असे प्रतिपादन प्राचार्य बळीराम चौरे यांनी केले.लातूर तालुकास्तरीय निष्ठा शिक्षक प्रशिक्षण टप्पा क्रमांक ३ साठी सहभागी प्रशिक्षणार्थींशी श्री शंभूलिंग शिवाचार्य विद्यालयातील सभाग्रहात ते बोलत होते.

             या समयी विचार पिठावर प्रशिक्षण प्रमुख अधिव्याख्याता मुकुंद दहीफळे,शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रहास म्हेत्रे,विषय सहाय्यक सुहासीनी देशमुख,अय्यूब शेख यांची उपस्थिती होती.

 

पुढे बोलताना ते म्हणाले की,देश पातळीवरील दर्जेदार प्रशिक्षणाचे आयोजन या ठिकाणी केले असून जिल्हाभरात ५८८१ शिक्षकांना निष्ठा प्रशिक्षण दिले जात आहे. जी वात स्वतः पेटते तीच वात दुसरी ज्योत पेटवते.बालकांच्या भावनिक क्षेत्राचा विकास शाळा महाविद्यालयातून झाला पाहिजे.विद्यार्थी केंद्रीत अध्ययन अध्यापन पध्दतीचा वापर करताना ज्ञानरचनावादी संकल्पना,क्रतीतून आनंददायी शिक्षण,विद्यार्थ्यांचा भावनात्मक,कार्यात्मक क्षेत्र कौशल्यांचा विकास कसा साधावा या बाबत निष्ठा प्रशिक्षणात अंतर्भूत १२ घटक प्रशिक्षण काळात समजून घेवून त्याचा वापर अध्ययन अध्यापनात क्रमबध्द रितीने केल्यास अपेक्षीत यश मिळेल असेही ते म्हणाले.

 

प्रशिक्षणादरम्यान लातूरचे गटशिक्षणाधिकारी धनराज गीते यांनीही प्रशिक्षण स्थळी भेट देवून सहभागी शिक्षकांशी संवाद साधला व ५ दिवशीय निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान पूर्णवेळ सहभागी होवून विचारांचे सकारात्मक  मंथन करण्याविषयीचे व सुलभकांना आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले.

 

प्रशिक्षण सत्राच्या यशस्वितेसाठी तुकाराम पवार,सतीष सातपुते,रावसाहेब भामरे, रविंद्र पाटील, गोपाळ घाडगे, प्रभाकर हिप्परगे, नजीऊल्ला शेख,दत्तात्रय माळकर,संजय क्षिरसागर,गोविंद बोळंगे आदी परिश्रम घेत आहेत.