मुंबई येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शनात लातूरचे दोन महिला स्वयंसहाय्यता बचत गट ठरले सरस!


लातूर,दि.30:-उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असुन ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादीत केलेल्या विविध वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व त्यांची जास्तीत जास्त प्रसिद्धी व्हावी या उदेशाने मुंबई येथे दरवर्षी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.यावर्षीच्या प्रदर्शनामध्ये राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट विक्रीचा प्रथम सन्मान उदगीर तालुक्यातील आरसनाळ येथील हरिओम  महिला स्वयंसहाय्यता  समूहाने पटकाविला. तसेच आकर्षक स्टॉल मांडणी व सजावट साठीचा राज्यातील तृतीय क्रमांक लातूर तालुक्यातील मुरुड येथील नरेंद्रछाया महिला स्वयंसहाय्यता  समुहांने पटकाविला. सर्वोत्कृष्ट विक्री, डिजीटल व्यवहार व उत्कृष्ट नियोजन व विपणन व्यवस्थापनासाठीचा द्वितीय पुरस्कार जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, लातूर याना मिळाला. याप्रकारे लातूर जिल्ह्यातील 7 स्वयंसाहाय्यता बचत गटा पैकी दोन गटांना व जिल्हा अभियान कक्षास राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनात पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी दिली आहे.


यावर्षी महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री २०२० चे आयोजन दि.१७ ते २९ जानेवारी २०२० या कालावधीत मुंबई प्रादेशिक विकास प्राधिकरण मैदान क्र.१/४/५ व ६ बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स (पुर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून आलेल्या एकूण ५११ महिला स्वयंसहाय्यता समुहांनी सहभाग नोंदविला होता. लातूर जिल्ह्यामधून ०७ स्वयंसहाय्यता समुहांची निवड जिल्हास्तरावरुन करण्यात आली होती, ज्यामध्ये महिला स्वयंसहाय्यता  समुह उत्पादीत सेंद्रीय गुळ, दाळी, हळद, मसाले, शेंगदाना चिक्की तसेच विविध प्रकारच्या फळांच्या जेली, सोया उत्पादने, गोधडी व हस्तकलेच्या वस्तू इत्यादी साहित्याचा समावेश करण्यात आला होता. या प्रदर्शनात दोन स्वयंसहायता गटांना प्रथम व द्वितीय पुरस्कार मिळाले तर प्रदर्शनात सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यात लातूर जिल्ह्याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.


          लातूर जिल्हयाच्यावतीने  श्रीकांत श्रीमंगले (तालुका अभियान व्यवस्थापक, उदगीर ) यांनी  हा पुरस्कार ग्रामविकास व जलसंधारण मंत्री  श्री. हसन मुश्रीफ   यांच्या हस्ते व श्रीमती. आर. विमला (मुख्य कार्यकारी अधिकारी,  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत स्विकारला. या पारितोषिक वितरण संमारभास श्री. रविंद्र शिंदे (मुख्य परिचालन अधिकारी,  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुंबई ), श्री. दादाभाऊ गुंजाळ ( उपसंचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुंबई ) व सर्व सहभागी समुहांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. 


        जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.विपीन ईटनकर, सह जिल्हा अभियान संचालक  संतोष जोशी,   जिल्हा अभियान व्यवस्थापक     देवकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहभागी समुहांनी तसेच वैभव स. गुराळे यांनीं अथक परिश्रम घेतले. जिल्ह्यातून सर्व स्तरावरुन याबाबत अभिनंदन करण्यात येत आहे.यामुळे लातूर जिल्हातील सर्व ‘हिरकणी’ मध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे व येणा-या पुढील काळामध्ये उद्योगशीलतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी त्या नव्या उमेदीने तयारीला लागल्या आहेत.