शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन
शेतमालाची खरेदी विक्री सौद्यातच करण्याची मागणी 


लातूर /प्रतिनिधी : बाजारसमिती परिसरात शेतमालाची खरेदी -विक्री सौद्यातच करावी,पोटली आणि कडता बंद करावा आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी बाजार समितीच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले . 

अनेक वर्षांपासून बाजार समिती परिसरात शेतमालाचा सौदा न करता पोटलीच्या नावाखाली  खरेदी करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपये नुकसान होत आहे. यासाठी पोटलीचा व्यवहार बंद करावा ,अशी मागणी शेतकरी संघटनेने वारंवार केलेली आहे . त्या मागणीचा पाठपुरावा केलेला आहे . परंतु बाजार समिती प्रशासन पोटली व्यवहार बंद करण्याबाबत उदासीन असल्याचे आजवर दिसून आले आहे . त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि २०) बाजार समितीसमोर धरणे आंदोलन करून सभापतींना निवेदन देण्यात आले . पोटलीसोबतच कडता देखील बंद करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे . शेतमालाची खरेदी विक्री करताना सौद्यात जो भाव ठरेल त्याच भावाने खरेदी केली जावी . मालाच्या प्रतीनुसार जो दर निघेल तो दिवसभर लागु केला जावा .मालाचा दर्जा तपासण्यासाठी समितीने ग्रेडरची नेमणूक करावी .इनामच्या माध्यमातून खरेदी विक्रीचे व्यवहार केले जावेत . त्यामुळे देशभरातील व्यापारी खरेदी विक्रीच्या व्यवहारात उतरू शकतील . स्पर्धा वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे . मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे . 

  या आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधव मल्लेशे , जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी , युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके , कार्याध्यक्ष बालाजी जाधव , हरिशचंद्र सलगरे , बाबाराव पाटील , धर्मराज पवार , अशोक पाटील , विठ्ठल संपते , केशव धनाडे , किशनराव शिंदे वामनराव शिंदे आदींसह असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला . 

बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले .