कचरा संकलनासाठी प्रभाग 18 मधील 3 हजार महिलांना देणार बकेट


युवा नगरसेवक अजित पाटील यांची संकल्पना

लातूर :-स्वच्छतेसाठी सतत आग्रही असणार्‍या कव्हेकर परिवाराने संक्रांतीनिमित्त आगळावेगळा  उपक्रम राबवत शहर स्वच्छतेचा संदेश दिला. युवा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 18 मधील 3 हजार महिलांना संक्रांतीचे वाण म्हणून कचरा संकलनासाठी बकेट देण्यात अांले .विशेष म्हणजे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यासाठी दोन वेगवेगळी बकेट  महिलांना वाण म्हणून लुटण्यात आली . स्वच्छतेचा वसा घेतलेल्या कव्हेकर कुटुंबाने धार्मिक सणाचे महत्व कायम राखतानाच सामाजिक क्षेत्रात एक नवा पायंडा यानिमित्ताने पाडल्याचे दिसून आले .
     महिलांसाठी संक्रांत हा अतिशय महत्वाचा सण . यानिमित्त महिला सौभाग्य अलंकार आणि इतर वस्तू वाण म्हणून लुटतात, एकमेकींना देतात . महिलांच्या एकत्रीकरणासाठी धार्मिक आधार देऊन पुराणकाळात हा उपक्रम साजरा करण्यात येत असावा . आता बदलत्या काळाच्या संकल्पनेनुसार हा सण साजरा करावा या  हेतूने आपल्या प्रभागात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणार्‍या अजित पाटील यांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यासाठी दोन स्वतंत्र बकेट  देण्याची  संकल्पना मांडली . जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि अजित पाटील यांच्या मातोश्री सौ.प्रतिभाताई पाटील यांनाही ही संकल्पना अतिशय आवडली . त्यानुसार संक्रांतीनिमित्त कचरा जमा करण्यासाठी बकेट देण्याचा  निर्णय घेण्यात आला .प्रभागातील 3 हजार महिलांना अशी बकेट देण्यात येणार आहेत.
    आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे असे सर्वजण म्हणतात पण त्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही .स्वछतेत योगदान देत नाही .
कव्हेकर परिवाराने मात्र स्वतः पुढाकार घेत हा अनोखा उपक्रम राबवला .अजित पाटील यांच्याच पुढाकारातून प्रभाग 18 मध्ये एक विद्यार्थी एक वृक्ष ,कचर्‍यातील प्लास्टिक पासून रस्ता असे उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आलेले आहेत .
 परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या हळदी - कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांना
ही बकेट वाटप करण्यात आली . या हळदी - कुंकवास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर , जिल्हाधिकार्‍यांच्या पत्नी सौ. सोनम श्रीकांत सज्जन , जिल्हा नगर रचनाकार सौ निकिता भांगे, अजित पाटील कव्हेकर ,सौ.आदिती पाटील कव्हेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती . यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात मान्यवर उपस्थितांच्या हस्ते 200 महिलांना बकेट देण्यात आली . पुढील पाच दिवसात सर्व महिलांना ही बकेट घरपोच देण्यात येणार आहेत .
प्रभाग 18 मधील कव्हेकर परिवाराच्या या अनोख्या हळदी -कुंकवाची शहरात चर्चा होत असून स्वछतेसाठी राबवलेल्या उपक्रमाबद्दल परिवाराचे कौतुक केले जात आहे.