मुलाखतीच्या नाट्याचा भाग-2

 



काल परवापासून सर्वच वृत्त वाहिन्या आणि प्रसार माध्यमांमध्ये सुरु असलेले सामनामध्ये घेतलेल्या मुख्यमंत्र्याच्या नाट्यमय मुलाखतीचे प्रसारण. मुळात काय तर परंपरेनुसार अपार मताधिक्याने विजयी झालेल्या एखाद्या पक्षाचा किंवा सरकारचा बोलबाला जसा जगात व्हावा तसा शिवसेनेचा किंवा त्यांच्या महाआघाडीचा सध्या होत नाही. त्यामुळे विवंचनेत असलेले दूरदृष्टे (चष्मेबद्दूर) संजय यांना आपल्या मालकाची ही परवड कोणाकडूनच झाली नाही म्हणून खंत वाटली असावी म्हणून त्यांनी स्वतःच्या व्यासपिठावर स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी केलेला हा नाट्यमय प्रयोग म्हणावा लागेल. मुलाखतीच्या नाट्याचा भाग-1 सत्तास्थापनेनंतर अनेकांनी औपरिकता म्हणून पार पाडला होता. जो कि, टीआरपी आणि कोरम पूर्ण करण्यासाठीचा होता. परंतू हा भाग-2 आणि तोही नाटकी का म्हणायची वेळ  आली तर वरील प्रमाणे कोणीच सध्याच्या सरकारची दखल घेत नाही. त्याची कारणं ही तशीच असावीत, एकतर राज्य सरकार हे अल्पावधीचं असु शकतं म्हणून त्यांच्यासोबत जावून रिस्क घेणे नको आणि दुसरी अशी की केंद्राच्या विरोधात जाऊन त्यांच्याशी असणारी व्यावसायिकता गमावने. म्हणून कोणी यांना दाद देत नसावं किंवा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकी दरम्यान झालेले नाट्य हे मुख्य आणि प्रमुख नाटकी वावड्या होत्या आणि आता या त्यापुढील. राजकिय प्यादा हालवून केलेली राजकिय खेळी ही अतिशय प्रभावी आणि नैतिक होती असं न भासवता आम्ही किती शिताफिने तख्त पालटू शकतो आणि परंपरेने रुढ केलेली अभिवचने जे की ‘मातोश्री’ न सोडण्याची सत्तेसाठी षंढवृत्तीने (बाळासाहेबांच्या भाषेत) मोडू शकतो हेही यांनी यातून दाखवून दिलेलं असावं. अशा या झालेले कलयुगातील महाभारतात संजयाने प्रत्यक्षात धृतराष्ट्रालाच रणांगणात आणून केलेली पंचायत केलीय. आणि होऊ घातलेल्या महाभारताची नाट्य परिक्रमात असेल. विधूरदृष्टीने अतिआत्मविश्‍वासात असलेल्या संजयाची हे खेळी अंध धृतराष्ट्रासाठी स्वतःसह कौरवांच्या नाशाचे कारण ठरेल असं का वाटलं नसावं हा या नाट्यातला विनोदाचा भाग आहे. आज देशात अनेक राज्यांत भाजपा व्यतिरीक्त अन्य पक्षांशी हातमिळवणी करुन सत्तेत असलेल्या काँग्रेसला स्थैर्य आल्याचं समाधान आहे तर, दुसरीकडं शिवसेनेला मुख्यमंत्री पदी विराजमान होऊन आपण सर्वार्थाने विजयी होऊन यापुढे काहीही नाही केले तरी केवळ आपली आणि आपल्या मित्रपक्षांची पाठराखण केली तरी पुरेस आहे या अविर्भावात सध्या महाराष्ट्र सरकार आहे. कारण महाराष्ट्रात मागचा चार पाच दशकांपासून अस्थिर असलेल्या सरकारला कंटाळून बहुमताने आणि कार्यक्षम भाजपा सरकारमध्ये शिवसेनेला दुजाभाव केल्याची भावना जाणवत होती. त्या भावनेपोटी वेगवेगळया वावड्या उठवून आपल्या अकार्यक्षमतेला झाकण्यासाठी अनैतिक स्वरुपात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला धडपड करावी लागत आहे हे काल परवाच्या सामनामध्ये घेतलेल्या मुलाखतीवरुन दिसून आलं आहे. एक तर भ्रष्टाचाराच्या अरोपात असलेल्या आणि निष्क्रीय असलेल्या पक्षांना बाजू देऊन जनतेने युतीला बहुमत दिलं होतं. असं असताना मागच्या पंचवार्षिकमध्ये सत्तेत राहून कायम विरोधकांची भूमिका बजावणार्‍या शिवसेनेने विधानसभेनंतर आघाडीशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली आणि वेळोवेळी त्यांच्या कार्यक्षमतेवर, त्यांच्या स्थैर्यावर जनतेत संभ्रम दिसत आहे. विकासासाठी मताची झोळी मागणारांनी आणि अनैसर्गिकरित्या सत्ता स्थापन केलेली आहे. संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत पूर्वसूचनेनुसार मुख्यमंत्री उध्दवजींना जनतेच्या हिताचे प्रश्‍न विचारले. आता स्वतःच्या व्यासपिठावर कोणीही दिलखुलास बोलणारच आणि विशेष म्हणजे व्यासपिठ नव्हे तर घरच म्हणायला हरकत नाही पण. माग आपल्या घरात कोणीही बिनदिक्कतपणे बोलू शकतो त्यामुळे त्यांच्या बोलण्यातला बाणा हा निर्भीडच होता. पण त्यात त्यांना एक गोष्ट नाही कळली की आपली ही मुलाखत सर्व महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश बघणार आहे. स्वतःची पाठ थोपटून घेताना किंवा लाळ घोटताना संजय राऊतांनी उध्दवजींना आपण सर्वांच्या कारस्थाने उधळून लावली म्हणून शाब्बासकी दिली खरी पण महाराष्ट्रातील सकल जनता अजाणती नाही कोणी कारस्थानं केली आणि कोणी युतीच्या नावे मतांची परडी मागून नंतर जनमताचा अनादर करत महाआघाडीशी हातमिळवणी करुन मुख्यमंत्री पदाची खुर्ची काबीज केली. उध्दवजींनी माझ्या वडीलांना दिलेल्या शब्दासाठी कोणत्याही थराला जाणार असा निश्‍चय केला म्हणत होते पण त्यांच्या वडीलांनी आयुष्यभर ज्यांचा विरोध केला आणि त्यांच्या सोबत जाणारे शिवसैनिक षंढ असतील असं त्यांच्याच वडीलांनी अभिवचन जगजाहिर केलं होत ते प्रथमतः सार्थ करुन दाखवलं अशी ही या मुलाखतीतून अप्रत्यक्ष रित्या कबुली दिली. पुढे बोलता मुख्यमंत्री म्हणाले की मुख्यमंत्री पद हे काही स्वप्न पुर्ती नाही तर स्वप्नपूर्तीसाठी टाकलेलं पाऊल होतं. यामध्ये अजाणते पणी का होईना पण आपल्याकडून जनतेचा भ्रमनिराश झाल्याचं कबुलही केलं आणि आपण वचनभंग केल्याचं ही कबुल केलं. तरी परंतू असं असताना आपण ज्यांच्यासह गादीवर बसलोत त्यांचे सर्व गुन्हे माफ करुन  त्यांना व्हाईटकॉलर प्रदान करुन मागच्या काळात त्यांच्यावर केलेल्या अरोपांचे खंडण ही केलं. एव्हाणा त्यांच्या 25 वर्षांच्या राजकिय कारर्दीत साथीला असलेला साथीदार सावरलाय का नाही याची शंका व्यक्त करुन पुढील काळात धक्कातंत्राच्या जोरावर केलेल्या सत्तांतरातून मुंबई महानगरपालिका कशी वाचवायची यासाठीचीच हे केवीलवाणी धडपड होत असे त्यांच्या देह बोलीवरुन लक्षात येत होतं.