लातूर, दि. १४ ः लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीला मागच्या विधानसभा निवडणूकीपासून उतरती कळाच लागलल्यासारखे दिवस आले आहेत. मागच्या काही वर्षांत राष्ट्रीय नेतृत्वाने उज्वल झालेली भाजपा मात्र राज्यासह विभागीय आणि जिल्हा पातळीवर दूर्बल आणि दिशाहिन नेतृत्वामुळे दुभंगत चाललेली आपणास पहावयास मिळत आहे.
तसेच जिल्ह्यातील नेतृत्वाच्या होणार्या फेरबदलामुळे सध्या लातूर भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची सध्या ‘ना तेरी गिणती, ना मेरी बनती’ अशी आवस्था निर्माण झाली आहे. म्हणजे असे की, चार दिशेला भरकटलेल्या नेतृत्वात कोणाला गृहित धरायचं म्हणजे कोणाला मोजायचं आणि कोणामुळं माझं अस्तित्व राहिल हा यक्ष प्रश्न सध्या कार्यकर्त आणि पदाधिकार्यांना सतावत आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत अपेक्षीत यश प्राप्त होऊन सुध्दा महाराष्ट्रात सत्तेपासून दूर असलेल्या भाजपाला आता त्यांच्यातील अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे. राज्यात चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली परंतू देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूका झाल्या. अपेक्षीत यश मिळाले नसले तरी युती सरकारला साजेसे संख्याबळ उपलब्ध होते परंतू स्वकियांनी म्हणजेच पक्षातील मोठ्या भावाची कायम भूमिका पार पाडणार्या शिवसेनेने ऐन वेळी दगाबाजी केल्याने भाजपाला सत्तेपासून दूर रहावे लागले. यामुळे अर्थातच केंद्रीय नेतृत्वाने येथील नेतृत्वा शंका व्यक्त केली आणि येथील म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वच स्तरातील नेतृत्वात जणू खळबळच माजली आहे.
मागच्या काही दिवसांत लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांचा एक गट, तसेच मागच्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले पदाधिकारी आणि स्थानिकचे नेतृत्व यांचा दुसरा गट, त्याशिवाय नव्याने पक्ष नेतृत्वाने उमेदवारी दिलेली औसा मतदार संघात यशस्वी पदार्पण केलेले माजी मुख्यमंत्र्यांचे स्विय्य सहाय्यक आमदार अभिमन्यू पवार यांचा एक गट तर इकडे माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या आशिर्वादाने आणि बर्याच काळापासून पक्षात निष्ठेने कार्यरत असलेल्या कराडांचा एक अशा चार जणांची फळी लातूरच्या भाजपात निर्माण झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील भाजपा आणि भाजपा कार्यकर्ते हे अस्वस्थ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
अशातच लातूरमध्ये मागच्या मनपा निवडणूकीत मोठ्या प्रमाणात यश संपादन केलेल्या भाजपाच्या नेतृत्वाला आणखी मोठा धक्का बसला. हा धक्का गटनेते तथा भाजपाचे मागच्या अनेक वर्षांपासूनचे खंदे समर्थक बिरादार यांनी लातूर महानगर पालिकेच्या महापौर निवडीमध्ये अचानक केलेल्या दग्यामुळे लातूर भाजपात आणखी दूफळी निर्माण झाली होती. तसेच लातूर जिल्हा भाजपामध्ये याच दुफळीचे आणखी परिणाम पुढे लातूर जिल्हा परिषदेतही दिसून येऊ लागले. कारण लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत मागच्या अनेक वर्षांपासून भाजपाशी एकनिष्ठ असलेल्या आणि विधानसभा निवडणूकीसाठी जोरात तयारी करुन ऐन वेळेला राज्यपातळीवरील नेतृत्वाने उमेदवारी नाकारलेल्या रमेश कराडांनाही येथे जिल्हा अध्यक्ष पदासाठी डावलण्यात आले. यामुळे ग्रामीण मतदार संघात असलेल्या भाजपाच्या त्यांच्या गटातील पदाधिकार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचा सुर दिसून आला.
त्याशिवाय लातूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष पद भूषविलेले नागनाथ अण्णा निडवदे सध्या महामंडळावर गेल्याने तसेच शैलेश लाहोटी यांची लातूर शहर विधानसभेत सलग दुसर्यांदा धोबीपछाड झाल्याने जिल्हा नेतृत्वात बदल होण्याचे संकेत आहेत. आणि या बदलाच्या वार्यात अनेकांच्या नावाच्या वावड्या उडवल्या जात होत्या.
त्याशिवाय काल परवा लातूर ग्रामीणचे नेते आणि नाराज पदाधिकारी रमेशअप्पा कराड यांची लातूर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करुन त्यांची मनधरणी केली गेली. तसेच शहर जिल्हाध्यक्ष पदी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते, गुरुनाथ मगे यांची निवड करण्यात आली असली तरी जिल्ह्यातील या निवडीने अनेक दिग्गजांना डावलण्यात आल्याची चर्चा भाजपात पडलेल्या अंतर्गत चार गटांमधून होत असताना दिसत आहे.
लातूर भाजपातील गटातटाच्या राजकारणात कार्यकर्त्यांची ना तेरी गिणती,ना मेरी भी बनती अवस्था?