-हेमंत मुसरीफ पुणे
तडकल्या नात्याला
हवा सांधणारा जोड
जीवनात कधी तरी
लागे थोडी तडजोड
तसा खूप अवघड
तडजोड एक गड
उतार नेईल तळाशी
तेवढाचं जड चढं
अहंपणा जोडे काढं
दोन पाऊले या पुढं
इगो भिगो ठेवं मागे
जुळवा तुटलेले तडं
सूड उगवतो सूड
लावे नात्याला चूड
दैत्य शंकासूर गूढ
गाढा संतापाचं मढं
द्वेष गिधाडांची धाड
संगे निशाचर चीड
त्यांची चेपताचं भीड
काय माणसांचा पाड
जीभेला कुठले हाड
तोडे बंध तडा तड
शब्दाने शब्द वाढं
उसवतचं जाते तेढं
ऐक दुस-यांचं थोडं
नको दामटाया घोडं
झडे विश्वासाचं झाड
लागे संशयाची कीड
नातं टिकवणं जड
तळ हातावर फोडं
गुपीत होता उघड
नातं पडे धडा धड
तेव्हा फक्त तडजोड
शेवट करीलं गोड