विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र साजरा केला जातो. अशा या कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचा जागर तेवत ठेवत मराठी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करून दिला ,ही महाराष्ट्र राज्याच्या व मराठी भाषेच्या गौरवाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची गोष्ट आहे. अशा या मराठी भाषेसंदर्भात संत ज्ञानेश्वर म्हणतात की,
" तीर्थामध्ये काशी - व्रतांमध्ये एकादशी
भाषामध्ये तैशी - मराठी शोभिवंत "
या उक्तिप्रमाणे मराठी भाषिकांच्या भावविश्वात मराठी भाषेचे स्थान किती महत्वाचे आहे याची प्रचिती येते. मातृभाषा मराठी ही मराठी माणसांच्या जीवनातील अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत पेटविणारी मशाल आहे.म्हणूनच माता,मातृभूमी आणि मातृभाषा ही महाराष्ट्रातील लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशा या मराठीची थोरवी गाताना फादर स्टिफन्स असे म्हणतात की,
" जैसी पुष्पामाजी पुष्प मोगरी
की परिमळामाजी कस्तुरी
तैसी भासांमाजी साजिरी मराठिया "
असा मराठी भाषेचा महिमा अगाध आहे.म्हणूनच
‘अमृतातेही पैजा’ जिंकणाऱ्या माय मराठीची महाराष्ट्रात मातृभाषा म्हणून दर्जा आहे. त्यामुळेच जागतिकीकरण, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावी रेट्यातही मराठी भाषा तग धरून आहे.तिचे भाषिकदृष्टया कार्य अविरतपणे सुरूच आहे.भाषावार प्रांतरचनेच्या माध्यमातून मराठीचा विकास करण्यासाठी सुरूवातीपासूनच शासन व मराठी भाषिकांकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून मराठी ही सार्वजनिक व्यवहाराची, व्यवसायाची भाषा म्हणून वृद्धिंगत होण्यासाठी मराठी भाषिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आज मराठी भाषेवर इंग्रजी, संस्कृत, कन्नड, हिंदी, जर्मन, पोर्तुगीज, अरबी, फारशी अशा अनेक भाषांचे आक्रमण होत आहे, या भाषांतील अनेक शब्दांचा शिरकाव मराठी भाषेत होत आहे. त्यामुळे मराठी भाषेत खुप परिवर्तन झाले आहे. कन्नड तेलगू – तमिळ भाषांनी जशी आपल्यातील शुध्दता जपून ठेवली, तशी मराठी भाषेनी आपली शुध्दता जपून ठेवण्यासाठी प्रत्येकांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. मराठी भाषेचा हट्ट मनाशी बाळगला पाहिजे.कारण महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या प्रदेशातील भाषेचा प्रभावही मराठी भाषेवर जोमाने होत आहे,त्याकडेही लक्ष दिले पाहिजे.याचबरोबर ‘मराठी’ भाषा व मराठी विषयाची गोडी वाढविणे ही आधुनिक काळाची गरज आहे. कारण इंग्रजी भाषेला अवास्तव महत्व न देता तिच्याबरोबर मराठी भाषेला प्रोत्साहन दिले पाहिजे. आज इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणामुळे आपल्या पाल्यांना इग्रंजी माध्यमाच्या शाळेत घातले जात आहे. म्हणून मराठी माणसांनी आपल्या जीवनव्यवहारात मराठीला दुय्यम स्थान न देता प्रथम स्थान दिले पाहिजे. ग्रामीण व शहरी भागातील माणसांनी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून जे मोठे यश संपादन केले आणि जी मोठी पदे मिळविली त्या सर्व मराठी माणसांनी आपल्या मुलांना जागतिक व्यवहाराच्या इंग्रजी भाषेच्या माध्यमातून ज्ञान देण्याबरोबर मराठी भाषेचे ज्ञान मिळाले पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे. याशिवाय राजकीय नेतृत्वानी मराठी भाषेसंदर्भात उदासीनता न दाखवता सकारात्मक भूमिकेतून कार्य केले पाहिजे. वाचन संस्कृतीची जोपासणा केली पाहिजे. बदलत्या व्यापारी धोरणांचा परिणाम मराठी भाषेवर होत आहे ,ते थांबवले पाहिजे. मराठी भाषिकांत मराठी भाषा प्रभुत्व निर्माण केले पाहिजे. परदेशी विद्यापीठाच्या स्थापनेला महाराष्ट्रात चालना मिळत आहे. परप्रांतियांचे आगमन मुंबई, पुणे यासारख्या शहरात होत आहे. मराठी मुलुख असतानाही काही जणांना मराठी भाषेत बोलणे ओंघळवाणे वाटत आहे. ती भावना मनातून काढून टाकली पाहिजे.याशिवाय मराठी भाषिक असतानाही मराठी भाषिक माणसांच्या मनात मराठी भाषेविषयी अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत,ते गैरसमज दूर केले पाहिजेत. दर्जेदार साहित्य निर्मितीला वाव दिला पाहिजे. याशिवाय महाराष्ट्रात मराठी या ऐच्छिक विषयाला पाली, हिंदी, इंग्रजी, रशियन, जर्मन, संस्कृत असे पर्यायी विषय आहेत. म्हणून अभ्यासक्रमात मराठी भाषेच्या अध्यापन व अध्ययनाविषयी लक्ष दिले पाहिजे.पालक व विद्यार्थ्याची मराठी भाषेसंदर्भात मानसिकता बदलली पाहिजे. साहित्य संमेलनात अलीकडे मराठी भाषेचा जागर सोडून इतर गोष्टीवर वाद होत आहेत. निपक्षपातीपणे साहित्यिकांना प्रोत्साहन दिले जात नाही. अनेक साहित्यिक वादाच्या भोवऱ्यात आणि आर्थिक विवंचनेत अडकले आहेत. तसे वाद होऊ न देता, आर्थिक विवंचनेतील साहित्यिकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जास्त लक्ष दिले पाहिजे. मराठी भाषेचे भवितव्य व भविष्याबाबत प्रयत्न केले पाहिजेत. आज महाराष्ट्रात सेट, नेट, एम. फिल., पीएच. डी. यासारख्या मोठ्या पदव्या मराठी भाषेत मिळवूनसुध्दा नोकऱ्या लागत नाहीत.त्यामुळे अनेक मराठी भाषिक बेकार तरूणाईची फौज निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मराठी भाषिक शाळेत,विद्यापीठात, महाविद्यालयात बेरोजगार तरूणांना नोकऱ्या शासनानी दिल्या पाहिजेत. त्यावर काही ठोस पावले उचलली पाहिजेत.याशिवाय महाराष्ट्रात आज अनेक बोलीभाषा शेवटच्या घटका मोजत आहेत. तीच तऱ्हा मराठी भाषेची न होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. अशा या मराठी भाषेसंदर्भात मराठी भाषिकांनी चिंतन, मनन करणे ही काळाची गरज आहे, त्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या पाहिजेत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि शासनदरबारी तिची योग्य दखल घेतली पाहिजे, म्हणूनच मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. परंतु या प्रयत्नाला अजूनही यश आलेले दिसत नाही. त्यामुळे अशा पडत्या काळात मराठी भाषिक माणसांनी मराठीचे संवर्धन व मराठी भाषाभिवृध्दीसाठी पुस्तक प्रकाशन व नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. कामकाजाची व ज्ञानभाषा म्हणून मराठीचा वापर केला पाहिजे. बँकक्षेत्र, कृषी, न्याय, संगणक, रेल्वे, शिक्षण, पोस्ट अशा सर्वांगीण क्षेत्रात, प्रशासकीय व्यवहारात मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. पालक व विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच प्रवेश घेण्याचे खूळ बाजूला ठेवले पाहिजे. जन्मभूमी, मातृभाषा मराठीबद्दलची अस्मिता मराठी माणसांनी वृध्दिंगत केली पाहिजे. प्रसारमाध्यमांनीही मराठी भाषेचा जागर तेवत ठेवला पाहिजे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, फादर स्टिफन्स, सुरेश भट आदि संत, अभ्यासकांनी मायबोली मराठी भाषेचा गोडवा गायीला, तोच वारसा आजच्याही पिढीने पुढे घेऊन गेला पाहिजे.म्हणजेच, सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे,
" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी "
अशी भूमिका मराठी भाषिकांनी ठेवली पाहिजे.याचबरोबर इंग्रजी ही ज्ञानार्जन व जगाशी संवाद साधण्याची भाषा असली तरी मराठी भाषिकांनी तिच्या नादात मातृभाषा मराठीला विसरता कामा नये. मराठी भाषेत ज्ञानाचे भांडार अवाढव्य आहे. कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र – आत्मचरित्र, लघुनिबंध, प्रवासवर्णन अशा सर्वच वाड्:मय प्रकारात नवोदित पिढीतील लेखकांनी सृजनशील साहित्यनिर्मिती केली पाहिजे. अलीकडे शासनाने पुस्तकाचे गाव ‘भिलार’ ला नावारूपास आणून मराठी भाषेची चळवळ वृध्दिंगत करून मराठी भाषेला चालना दिली आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेसंदर्भात सक्षम चळवळी उभ्या केल्या पाहिजेत. साहित्य संमेलनातील वाद बाजूला ठेऊन मराठीचा जागर केला पाहिजे. लेखक, साहित्यिक आणि रसिकांनी आपापली कर्तव्य पार पाडून शासनदरबारी मराठी भाषेला सन्मान मिळवून दिला पाहिजे. मराठी साहित्य परिषद, वाड्:मयसंस्था आणि संघटनांनी आपली भूमिका चोख पाळली पाहिजे. सर्व विद्याशाखातील सर्व विषयात सर्व स्तरावर मराठी माध्यमातून शिक्षण देणारे व संशोधन करणारे एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे. इतरधर्मिय साहित्यिक व महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिकांनीही मराठी भाषा सातासमुद्रापलीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मराठी भाषाभिवृध्दीसाठी वेगवेगळे ग्रंथ, कोशनिर्मिती करून त्याचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. चांगल्या ग्रंथाना पुरस्कार मिळाले पाहिजेत, ग्रंथ प्रकाशकांनी केवळ पैसा हा हेतू डोळ्यासमोर न ठेवता उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीला चालना दिली पाहिजे. वि. दा. सावरकर, माधवराव पटवर्धन, श्री. कृ. कोल्हटकरांची भाषाशुध्दीची चळवळ पुढे नेली पाहिजे. याशिवाय मराठी भाषाभिवृध्दीसाठी मराठी भाषेत संशोधनाला चालना, मराठी विषय सक्तीचा, मराठी भाषा वापरासंदर्भात समाजप्रबोधन, संगणकासाठी मराठी-भाषेचा वापर, मराठीचे विविध उपक्रम, मराठी भाषेसंदर्भात राष्ट्रीय चर्चासत्र, कार्यशाळा व शिबीराचे आयोजन, शासकीय कामकाजाची भाषा आणि मराठी भाषेच्या वापराविषयी कडक कायद्याची अमंलबजावणी झाली पाहिजे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ अशी मराठी भाषेसंदर्भात सकारात्मक भावना ठेवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजूट झाले पाहिजे, तरच मराठी भाषेला साज चढेल. या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने तमाम मराठी भाषिक या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील या अपेक्षेसह.......
डॉ. रामशेट्टी शेटकार
मराठी विभाग
दयानंद विज्ञान महाविद्यालय,लातूर