लातूर (प्रतिनिधी):-लातुरात सुरू असलेल्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामन्यात केवळ ११ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ८८ धावा काढून लातूर विजयाचा मानकरी ठरला. जिल्हाधिकार्यांची फटकेबाजी व लातूरच्या संघाने मिळवलेला विजय पाहून सार्यांनाच आनंदाचे भरते आले. उत्साह ओथंबला व हलगी सुरू झाली. अनेकांनी ठेका धरला. महाराष्ट्राच्या या पारंपरीक वाद्याने जिल्हाधिकारीही मराठमोळे झाले अन् त्यांनीही हलगीच्या तालावर तालावर ठेका धरला. जिल्हाधिकार्यांनी तुफान फटकेबाजी केली आणि हा आनंद त्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरून साजरा केला.
विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या आजच्या दुसर्या दिवशी जिल्हा क्रीडा संकुल मैदान,बॅडमिंटन हॉल, एस एम आर स्विमिंग व दयानंद महाविद्यालय मैदान याठिकाणी व्हॉलीबॉल, क्रिकेट टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, खोखो व स्विमिंग आदी स्पर्धां झाल्या. या स्पर्धांमध्ये औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली,नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याच्या विविध संघाने सहभाग घेतला.
लातूर विरुद्ध नांदेड असा क्रिकेट सामना झाला. त्यात लातूरने बाजी मारली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे लातूरच्या संघाचे कप्तान होते. नाणेफेक जिंकून नांदेडच्या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. फलदांज रोडे व श्रीकांत यांनी प्रत्येकी १८ व १६ धावांचे योगदान दिले. नांदेड संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात १२ षटकांत ८७ धावाचे आव्हान लातूरसाठी उभे केले. त्याला लातूरच्या संघाने चोख उत्तर दिले. संघाचे कर्णधार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूर संघाच्या वतीने तुफान फटकेबाजी करीत मैदानात धावांचा जणू पाऊस पाडला. त्यांनी २६ चेंडूत सर्वाधिक ३४ धावा काढल्या व एक गडी बाद केला. स्वप्निल पवार, अडसूळ यांनीही त्यांना तोलामोलाची साथ दिली. गोलंदाज विलास मलिशे, स्वामी व सुनिल शेळके यांची गोलंदाजीही लाजवाब ठरली.
आजच्या स्पर्धेच्या दुसर्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून यातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण आहे तानाजी मालसुरे यांच्या वर आधारित असलेले र्िींेीं;गड आला पण सिंह गेर्लािींेीं; हे समूह नृत्य व त्यातील कलाकार असणार आहेत. या समूह नृत्यातील कलाकार लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, तहसीलदार राहुल पाटील, नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह विलास मलिशे, श्रीमती अनिता ढगे, वाहिद शेख,गणेश शिंनगिरे, शरण पत्री, चंद्रकांत फड, संदेश राठोड, संजय जाधव, ज्ञानेश्वर काळे व जयेश जगताप यांचा सहभाग असणार आहे.
तसेच वैयक्तिक गीत गायना मध्ये अभिजीत अवधूते लाई वीना गई ते निभाई भी ना गई चे सादरीकरण करणार आहेत, तर वाळूत दंगला दारूत जिंगला हे नाटक काही लातूरचे कलाकार सादर करणार आहेत यासह इतरही सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी लातूरकरांसाठी असणार आहे.
लातूर येथे अत्यंत उत्सहात व आनंदाच्या वातावरणात सुरू झालेल्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ दिनांक ९ फेब्रुवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात दुपारी ४.३० वाजता होणार आहे. या बक्षीस वितरण समारंभास राज्याचे संसदीय कार्य, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता,सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन व रोजगार हमी योजना विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी या तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेते खेळाडू व विजेते संघांना मंत्रीमहोदयांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
लातूरच्या जिल्ह्याधिकार्याचा तालावर ताल