नवं संकट, ‘कोरोना’सह राज्यात आता माकड’ताप’, दोघांचा झाला मृत्यू

मुंबई :- राज्यामध्ये एकीकडे करोनाची दहशत असतानाच दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्गमध्ये माकडतापाचे संकट आलं आहे. येथील बांदा दशक्रोशीत माकडतापाने या हंगामात दुसरा बळी घेतला आहे. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दिनेश शांताराम देसाई (४५, रा. डेगवे – मोयझरवाडी) यांचा माकडतापाने मृत्यू झाला. गेले दीड महिने त्यांच्यावर बांबोळी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती उपचारांना हवी तशी साथ देत नव्हती. माकडतापाचा या हंगामात दुसरा बळी गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.





डेगवे – मोयझरवाडी येथील दिनेश देसाई यांचा तापाचा वैद्यकीय अहवाल माकडताप पॉझिटीव्ह आला होता,दि. ८ फेब्रुवारी रोजी त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात गेले दीड महिना त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नव्हती. अखेर मंगळवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.


पंधरा दिवसांपूर्वी पडवे माजगाव येथील लक्ष्मण शिंदे यांचा माकडतापाने मृत्यू झाला होता. आतापर्यंत माकडताप पॉझिटीव्ह तीन रुग्ण बांबोळीत उपचारासाठी दाखल झाले असून पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तिसरा रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. माकडतापाच्या पार्श्वभूमीवर आठ गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


माकडतापाची लक्षणे काय

ताप, सांधेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा ही माकडतापाची प्राथमिक लक्षणे आहेत. तसेच या आजारामध्ये ताप गेला तरी सांधेदुखी कायम राहते.