शहर भाजपाच्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन

लातूर/प्रतिनिधी ः कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा सुध्दा दिलेला नाही. त्याचबरोबर शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्यात अपयशी ठरलेल्या सरकारच्या विरोधात शहर भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. आंगण हेच रणांगण समजून केलेल्या या आंदोलनात शहरातील ३२८ बुथअंतर्गत प्रत्येकी २५ कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. 

कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. महाराष्ट्रात याचा संसर्ग अधिक प्रमाणात झालेला असून देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात  आहे. त्याचबरोबर कोरोना बळींची संख्याही महाराष्ट्रातच अधिक आहे. या परिस्थितीवर मात करून संसर्गावर नियंत्रण मिळण्यात महाविकास आघाडी सरकारला सपशेल अपयश आलेले आहे. राज्य सरकारच्या वतीने सर्वकाही व्यवस्थीत असल्याचे अभासित चित्र उभे केले जात असल्याचा आरोप करून शहर भाजपाच्या वतीने आज महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. या संसर्गामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पॅकेज सुध्दा जाहीर करण्यात आले आहे. मात्र राज्य सरकारने अशा कोणत्याही प्रकारची घोषणा अद्याप केलेली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना कोणताही दिलासा मिळालेला नसून नाभिक, चर्मकार, रिक्षावाले, फेरीवाले, कुंभार यासारखे हातावरचे पोट असणार्‍यांचे मोठे हाल होऊ लागले आहे. विशेषतः कोरोनाच्या या युध्दात योध्दे म्हणून जे लढत आहेत, असे डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस, प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी यंाच्यावरील हल्लेही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. या सर्व परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेले महाविकास आघाडी सरकार डोळ्यावर पट्टी आणि कानात बोळे घालून झोपेचे सोंग घेत आहे. या झोपलेल्या सरकारला जागे करून महाराष्ट्राचा बचाव करण्यासाठी भाजपाच्या वतीने आज माझे आंगण हेच रणांगण... ही भूमिका घेऊन आंदोलन करण्यात आले. शहरातील गांधी चौकात शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळत केलेल्या या आंदोलनात माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, मनपा गटनेते ऍड. शैलेश गोजमगुंडे, माजी उपमहापौर देविदास काळे, ऍड. दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, गणेश गवारे, शशिकांत हांडे आदींचा समावेश होता. सदर आंदोलन तोंडाला काळा मास्क लावून आणि खांद्याला काळी फित लावून करण्यात आले. 

या आंदोलनाअंतर्गत शहर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या ३२८ बुथअंतर्गत प्रत्येकी २५ कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.