लातूर/ प्रतिनिधी :आजपर्यंत कोरोनामुक्त असणाऱ्या लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेची यंत्रणा तातडीने गतिमान झाली असून ज्या परिसरात रुग्ण सापडला तो परिसर तातडीने सील करण्यात आला आहे. याशिवाय प्रतिबंधासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून कंटेनमेंट झोन म्हणजेच बाधित क्षेत्रातील सर्व नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग केले जात आहे. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची पडताळणी करण्याात येवून त्यांच्याही तपासणी करण्यात येत आहेत. शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्कता बाळगावी, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण आठ दिवसांपूर्वी बीदर येथून लातूर येथे आलेला आहे. शहरातील लेबर कॉलनी भागात त्यांचे वास्तव्य आहे. नाकाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेले असता त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये मनपाची यंत्रणा तातडीने कामाला लागली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे समजताच पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार महापौरांनी स्वतः त्या परिसरात उपस्थित राहून यंत्रणा गतिमान केली.
महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासमवेत उपजिल्हाधिकारी सुनिल यादव ,तहसीलदार स्वप्निल पवार , शहर पोलिस उपाधीक्षक सचिन सांगळे ,महापालिका सहाय्यक आयुक्त सुंदर बोंदर, दिलीप चिद्रे यांनीही सर्व विभागाना कामाला लावले.
ज्या भागात रुग्ण आढळला त्या १०० मीटर परिसरातील सर्व रस्ते बॅरिकेटींग करून बंद करण्यात आले. बाधित व्यक्तीच्या परिवारातील सदस्य व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी सुरू करण्यात आली.
हा परिसर आता कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून पुढील १४ दिवस कोणालाही या परिसरात येता येणार नाही किंवा तेथून बाहेरही पडता येणार नाही. या कालावधीत परिसरातील जवळपास ३०० घरातील नागरिकांना योग्य दरात किराणा, भाजीपाला, दूध, औषधे अशा जीवनावश्यक वस्तू घरपोच पोचवण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी टास्क फोर्स गठित करण्यात आलेला असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली .
कंटेन्मेंट झोनसाठी विशेष पालक अधिकारी म्हणून क्षेत्रीय अधिकारी समाधान सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य विभाग प्रमुख म्हणून डॉ. सुहास गोरे आणि त्यांच्या अंतर्गत वैद्यकीय तज्ञ व नर्सेस तसेच आशा सेविकांचे पथक कार्यरत असणार आहे. आरोग्य पथकाच्या द्वारे घरोघर थर्मल स्क्रिनिंग करण्यास सुरुवात करण्यात आली असून सर्व नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोना रुग्णाची माहिती मिळाल्यानंतर तातडीने हा परिसर निर्जंतुक करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे या आजाराचा फैलाव होणार नाही. दरम्यानच्या काळात परिसरातील नागरिकांना इतर कसलीही वैद्यकीय अडचण जाणवली तर या आरोग्य पथकाच्या माध्यमातून घरी जाऊन त्यांची तपासणी व वैद्यकीय उपचार केले जाणार असल्याचेही महापौरांनी सांगितले