लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, निकालात मुलींनी मारली बाजी


लातूर/प्रतिनिधी  :- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. लातूर विभागाचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. लातूर विभागात मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण तब्बल ९४.०५ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.४६ टक्के आहे. लातूर विभागात सर्वाधिक निकाल हा लातूर जिल्ह्याचा आहे. लातूर जिल्ह्याचा निकाल ९२.६१ टक्के , नांदेड जिल्ह्याचा निकाल ८७.९४ टक्के तर धाराशिव जिल्ह्याचा निकाल ८७.८६ टक्के लागला आहे.
लातूरमधून बारवीच्या परिक्षेसाठी ८६,५८२ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी ८५,५६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील ७६८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. लातूर जिल्ह्यातील २९५ महाविद्यालयातील ३४०७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामधील ३१५६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर जिल्ह्याचा निकाल विभागात सर्वाधिक ९२.६१ टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्यातील २६३ महाविद्यालयातील ३६३८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामधील ३१९९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्ह्याचा निकाल ८७.९४ टक्के लागला आहे. धाराशिव जिल्ह्यातील १४३ महाविद्यालयातील १५१०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामधील १३२७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८७.८६ टक्के लागला आहे.
लातूर विभागामध्ये विज्ञान शाखेचा निकाल ९५.९२ टक्के, कला शाखेचा निकाल ८२.६५ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९३.७० टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ८३.२८ टक्के एवढा लागला आहे. लातूर विभागामध्ये विशेष प्राविण्यासह उत्तर्णी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७२८४ एवढी आहे. तर प्रथम श्रेणीत ३२८१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीत ३५२१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १५२१ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत. लातूर विभागात मुलीच अव्वल आहेत. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.०५ टक्के असून मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.४६ टक्के आहे. विद्यार्थ्यांना उद्यापासून गुणपडताळणी अर्ज करता येणार आहे. २७ जुलैपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे. प्रति विषयास ५० रुपये शुल्क ठेवण्यात आलेले आहे. छायांकित प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करावे लागतील. प्रति विषयासाठी ४०० रुपये शुल्क भरावे लागेल. पुनर्मूल्यांकनासाठी ३०० रुपये शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल.