सामाजिक संदेश देणारी माय क्लबची कार रॅली

लातूर (प्रतिनिधी):-माय क्लब या सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक संदेश देण्यासाठी कार रॅली काढण्यात आली . समाज जागृतीसाठी माय क्लबने काढलेली ही रॅली जिल्ह्यातील पहिलीच रॅली ठरली. 
माय क्लबचे अध्यक्ष प्रशांत व मोनिका राठी , सचिव आनंद व स्मिता राठी,सागर व देवकन्या मंत्री , अभिजीत व पूजा गिल्डा यांच्या पुढाकारातून ही रॅली काढण्यात आली. विविध प्रश्नांबाबत आजही समाजात जागरूकता झालेली नाही . अनेकदा माहिती असली तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही . त्यामुळे माय क्लबने या रॅलीच्या माध्यमातून समाज जागृती केली. राजस्थान विद्यालयाच्या मैदानावरून या रॅलीस प्रारंभ झाला . मिनी मार्केट , शिवाजी चौक या मार्गे राजीव गांधी चौकात रॅलीचा समारोप झाला . पाणी अडवा , पाणी जिरवा , जल पुनर्भरण , झाडे लावा - झाडे जगवा , बेटी बचाव - बेटी पढाओ , सेफ ड्राईव्ह - सेफ लाईफ ,पर्यावरण रक्षण - काळाची गरज यासारखे सामाजिक संदेश या माध्यमातून देण्यात आले . रॅलीत १०० होऊन अधिक कार सहभागी झाल्या होत्या. माय क्लबचे १४० सदस्य असून प्रत्येक सदस्य सहकुटुंब सहभागी झालेला होता. दर दोन महिन्यास क्लबच्या माध्यमातून अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते . सामाजिक संदेश देण्यासाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित ही रॅली लक्षवेधी ठरली .