नवे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे मूळचे लातूर जिल्ह्यातील दिवेगाव येथील रहिवाशी असून २०१२ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत त्यांनी राज्यातून पहिला तर देशात १५ व्या क्रमांकाने यश मिळविले होते. प्रारंभी त्यांनी ठाणे येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर दिल्ली येथे वनपर्यावरण मंत्रालयात सहाय्यक सचिव, गडचिरोली येथे आदिवासी विकास प्रकल्पात प्रकल्प अधिकारी म्हणून प्रभावी काम केले. तेथील दुष्काळ, नियोजन, कृषी समस्या, आदिवासी जमिनी आणि आदिवासींचे हक्क यावर त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी म्हणून दहा महिने आपली कारकिर्द गाजवली होती. लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर दिवेगावकर यांनी दुष्काळ नियोजन आणि पाणी नियोजनावर परिणामकारक काम करून, लातूरकरांना मोठा दिलासा दिला. त्यानंतर गतवर्षीपासून पुणे येथे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संचालकपदाचा कार्यभार ते सांभाळत होते.
आता शासनाने दिवेगावकर यांची बदली उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून केली आहे. त्यांचा पदभार अन्य अधिकार्याकडे सोपवून उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडून पदभार घेऊन कर्तव्यावर रुजू होण्याबाबत त्यांना आदेशित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत लोकांच्या सहभागातून करोना तपासणी प्रयोगशाळा उभारणीचे महत्वपूर्ण काम केले आहे. दिपा मुधोळ यांची नियुक्ती लातूर माहनगरपालिकेच्या आयुक्तपदी झाली असल्याची माहिती आहे.