मुलांमध्ये देशभक्तीची भावना रुजवणे गरजेचे : जी. श्रीकांत

लातूर, दि. २३ :  केवळ प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यानच नव्हे तर मुलांमध्ये देशभक्तीची भावना कायमस्वरूपी  रुजवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. 
येथील श्री व्यंकटेश शिक्षण संस्थेच्या वतीने   प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या  व्यंकटेश महोत्सवाचे औचित्य साधून  ११ देशभक्तीपर समूह गीत गायन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जी. श्रीकांत बोलत होते. यावेळी नगरसेवक व्यंकट वाघमारे, पत्रकार शशिकांत पाटील , संस्थेचे सचिव प्रशांत पटणे , उपाध्यक्ष संतोष पंचाक्षरी, संस्था सदस्य राम यादव,  ज्येष्ठ कार्यकारी सदस्य श्रीमती शांताबाई शिवप्पा  पटणे , सूर्यकांत पटणे ,समन्वयक सिद्धेश्वर आलमले ,  मुख्याध्यापक आर.बी. देशमुख, डी.एस. सलके , पर्यवेक्षक आर.ए. होनराव, सौ. एम.व्ही. वावरे, सी.व्ही. मेटे , संजय कलशेट्टी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लावण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन अनेक शाळा, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेणार्‍या व्यंकटेश शिक्षण संस्थेचे आपण जाहीर अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या  देशभक्तीपर उपक्रमांची माहिती आपल्यापर्यंतच मर्यादित न ठेवता ती आपले मित्र परिवार, कुटुंबिय  व समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही श्रीकांत यांनी केले.  या संस्थेचे संस्थापक सचिव दिवंगत शिवप्पा  पटणे  गुरुजी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील महान योगदानाची आठवण काढून जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी पटणे  गुरुजींनी  समाजाच्या तळागाळातील सर्वच  स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे नमूद केले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी व्यंकटेश शिक्षण संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून या विद्यालयाच्या संगीत शिक्षक शंकर जगताप व त्यांच्या संगीत संचाला प्रजासत्ताक दिनी क्रीडा संकुलावर होणार्‍या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था समन्वयक सिद्धेश्वर आलमले यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल थोडक्यात विशद केला तसेच भविष्यात संस्थेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या उपक्रमांविषयी माहिती दिली. संस्थेच्या उभारणीत दिवंगत ब्रिजमोहनजी अग्रवाल, दिवंगत तम्मणप्पा  सिद्धेश्वरे , कमरोद्दीन  खोरीवाले, रामकिशन मालू,  श्रीनिवास मंत्री , वसंतराव यादव,  विश्वनाथप्पा  बनाळे  यांचे योगदान अतुलनिय  असल्याचे सांगितले. संस्थेसाठी जागा उपलब्ध करून देणार्‍या चौदाघर मठ  देवस्थानप्रतीही  त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.  यावेळी विद्यालयाच्या १ हजार १११ विद्यार्थ्यांनी सलग ७१ मिनिटे ११ देशभक्तीपर समूह  गीत  गायन करून उपस्थितांची मने  जिंकली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. एम.एस. पाटील व बी.ए. पुराणिक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एस.पी. राजमाने यांनी केले.