लातूर,दि.२४ :- लातूर शहराला पिण्याच्या पाण्याचा शाश्वत पाणी पुरवठा करण्यासाठी महानगर पालिका , एमजी.पी. व जिल्हा प्रशासनाने परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या.
शासकीय विश्राम गृहात आयोजित महानगर पालिका बैठकीत ते बोलत होते. या वेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, महापालिका आयुक्त एम.डी.सिंह, उपायुक्त संभाजी वाघमारे, हर्षल गायकवाड जिल्हा प्रशासन अधिकारी (न.पा.),सतीश शिवणे उपस्थित होते.
या वेळी आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, लातूर शहराला शाश्वत पाणी पुरवठा योजना करुन दररोज पिण्याचे पाणी पुरविले जाणार असून यासाठी प्रशासनाने परिपूर्ण प्रस्ताव दाखल करावेत. लातूर शहराला लागणार्या पायाभुत सुविधा संबंधित विभागाने उपलब्ध् करुन दयाव्यात. शासन आपल्या विविध योजनेच्या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध् करुन देईल, असे अश्वासन देऊन महानगर पालिकेतील सौरऊर्जा, प्रधानमंत्री अवास योजना ,कचरा व्यवस्थापन व इतर प्रत्येक विभागाचा सविस्तर आढाव घेऊन संबंधीत अधिकार्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या.
प्रारंभी महापालिका आयुक्त एम.डी.सिंह यांनी आपल्या प्रस्तावीकात महानगर पालिकेच्या प्रत्येक विभागाचे माहिती विशद केली. या आढावा बैठकीस महानगर पालिकेतील अधिकारी पदाधिकारी तसेच महानगर पालिकेचे सदस्य उपस्थित होते. महानगर पालिकेचे महापौर विक्रांत गोंजमगुंडे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.
शहराला शाश्वत पाणी पुरवठा करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावा -पालकमंत्री देशमुख