बारावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
लातूर, दि. 31 ः भितीला लपवून ठेऊ नका, परिक्षेची भिती वाटली तरच अभ्यास चांगला होतो, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मार्गदर्शक सुनील मिरचंदानी यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
येथील एम्स् परिवाराच्या वतीने बारावीची परिक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी 12 वी नंतरचे नवीन क्षितीज या विषयावर गुरूवारी सायंकाळी दयानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना सुनील मिरचंदानी बोलत होते.
या प्रसंगी संस्थाचालक रविंद्रसिंह धोटे, सुधाकर जोशी, प्राचार्य डी. एन. केंद्रे, अजित पाटील कव्हेकर, पतंजलीचे विष्णु भुतडा, नवीन हरजवानी, सिमा गांधी, डॉ. नागोराव बोरगावकर, पृथ्वीसिंह बायस, विनय जाकते, अॅड. राहुल मातोळकर, अॅड. प्रणव रायचुरकर, अॅड. रवि पिचारे, प्रा. सुनील फुलारी, अॅड. विराज माकणीकर, प्रा. विवेक हुंडेकर, प्रा. पांडुरंग कुलकर्णी, प्रा. प्रदीप चेंडकाळे, मयंक आचार्य, मनिष संतोष, एम. एस. हाश्मी, नरेंद्रसिंह उत्पात, केदार इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गोंधळ घालून दुसर्यांचे जीवन उध्वस्त करू नका, असा सल्ला विद्यार्थ्यांना देऊन सुनील मिरचंदानी म्हणाले की, तणावामुळे अभ्यास होत नाही, नापास होण्याची भिती आहे. म्हणून आत्महत्या करावीशी वाटते, अशी कारणे दिली जातात, ती अयोग्य आहेत. अभ्यासाची, परिक्षेची भिती व काळजी वाटलीच पाहिजे. तरच चांगला अभ्यास होतो. भितीचा सामना करा. नापास झालात तरी घाबरण्याचे कारण नाही, ती यशाची पहिली पायरी समजा. जो अभ्यासात टॉपवर आहे तो जीवनातही टॉपवरच असतो.
निवांत व शांत अभ्यास करण्यासाठी ग्रंथालय ही चांगली जागा आहे. अभ्यासासाठी बर्याच ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत. त्याचाही लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, असे नमुद करून मिरचंदानी यांनी प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना टिप्सही दिल्या. यावेळी सिमा गांधी, धोटे, प्राचार्य केंद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले. राहुल कुलकर्णी यांनी आभार मानले.
परिक्षेची भिती वाटली तरच अभ्यास चांगला होतो-सुनील मिरचंदानी