सभागृहात उपस्थित न राहता भाजप सदस्यांनी राजकारणासाठी महापुरुषांचा आधार घेऊ नये -उपमहापौर चंद्रकांत बिराजदार
लातूर /प्रतिनिधी : लातूर शहरातील नाट्यप्रेमींसाठी शहरात नाट्यगृह उभे राहत आहे . या नाट्यगृहातील विविध दालनांना भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी,हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि लोक नेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची नावे देण्याचा निर्णयही मनपा सर्व साधारण सभेत घेण्यात आला आहे. मात्र नाट्यगृहाला श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याला भाजप सदस्य तथा गोजमगुंडे परिवारातीलच सदस्य राजकारण करत आहेत.सोमवारच्या सर्वसाधारण सभेत हा विषय असताना शैलेश गोजमगुंडे यांनी बाहेर न जाता सभागृहात जर चर्चा केली असती तर आज गैरसमज पसरवण्याची वेळ भाजपवर आली नसती.सभागृहात विषय न मांडता,चर्चा न करता उगाच महापुरुषांच्या नावावर राजकारण होणे हे लातूरसारख्या शांतताप्रिय शहरात योग्य नाही.सर्वच नेते हे आमच्यासाठी आदरस्थानी आहेत.आणि हा निर्णय महापौरांचा नसून संपूर्ण सभागृहाचा आहे अशी माहिती उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिली .
शहरातील नाट्य रसिकांसाठी उभारण्यात येणारे नाट्यगृह सुसज्ज असणार आहे . यात नाट्यकर्मीना आवश्यक असणार्या सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नियोजित नाट्यगृहास नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याची अनेक वर्षांपासुनची मागणी होती . शहरातील रंगकर्मी व नाट्यप्रेमींनी त्यासाठी अनेकदा पाठपुरावा केलेला होता . त्यानुसार २०१६ साली नटवर्य श्रीराम गोजमगुंडे नाट्यगृह या नावाने आजतागायत अर्थसंकल्पीय तरतूद कायम आहे. नाट्यगृहास श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याची मागणी ज्येष्ठ रंगकर्मी यांच्या कडून वेळोवेळी केली जात होती. तसेच माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांनीही याबाबत सूचना केल्या होत्या. याचबरोबर नियोजित नाट्यगृहात विशेष दालने तयार केली जाणार आहेत . या दालनांना देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी , हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि जेष्ठ नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांची नावे देण्यासाठी पुढाकार घेवून सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेला आला. त्यावेळी या विषयावर चर्चा झाली.