नुकतंच महाराष्ट्रासह देशात राजकिय आणि सामाजिक पटलावर एका नव्या वादाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे तो म्हणजे छ. शिवाजी महाराजांच्या नामोल्लेखावरुन. एकूणच ही परिस्थिती यापुढे प्रत्येक नेत्यांच्या आणि महापुरुषांच्या बाबतीत होणे क्रमप्राप्त असेल असे गृहित धरायला हरकत नाही. यात काही निघ्नसंतोषीवृत्तींना याचे आघोरी समाधान वाटत असेलही पण दुसरी बाजू अशी की, सहिंष्णूवृत्तीच्या समाजातील घटकाला याचा मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. आणि जर तसे केले गेलेच तर त्यांच्या नावापुढं अगदी बालपणापासून त्या संत, महात्यांना, किंवा नेत्या, पुढार्यांना विद्यमान परिस्थितीत लागू असलेल्या पदव्यांसह नामोच्चार करावा ही संहिता ही अस्तित्वात आणावी लागेल. जसे की, आपल्याकडे गल्लोगल्ली, दोन-चार शिवाजी भेटतील, एक दोन बाबासाहेब असतील, दोनचार बसवेश्वर असतील, चार पाच ज्योतिबा असतील, कोणी हणुमान, मारुती, राम, लक्ष्मण, सिता, मिरा असे अनेक देवी, देवतांची, व संत, महात्म्यांची नावे आपल्या पालकांकडून धारण केलेल्या लोकांना त्यांच्या उपाधीसह नामोल्लिखत करावे का...? असा प्रश्न निर्माण होतो. कारण आपल्याकडं देवी, देवतांची नावे आपल्या पाल्यांना देण्याची पूर्वापार परंपरा आहे. यामागची कारणे ही तशीच आहेत. कारण भोळ्या भाबड्या माय बापांना आपला पाल्य मग ते मुल मुलगी असो की मुलगा यांना देवी, देवता किंवा समाजातील संत, हात्म्यांची नावे दिल्याने काही प्रमाणात का होईना पण त्यांचे गुण वा वृत्ती नाव धारण करणार्यांत उतरतील अशा प्रांजळ अपेक्षा असाव्यात. परंतू विघटनवादी समाजात आणि इतिहाससाक्षी असलेल्या खेकडा वृत्तीच्या लोकांनी भरतवर्षात आजपर्यंत परकिय शक्तींना आपल्या समाजावर, देशावर, संस्कृतीवर राज्य करण्याचे किंवा वर्चस्व दाखवण्याच्या संधी याच वृत्तींना दिल्या हे ही सांगणे क्रमाप्राप्त वाटते. या मागचा मतीतार्थ एवढाच की, सत्तांतराच्या द्वेषापोटी किंवा राजकिय आकसापोटी यापुढील काळात आपल्या देशात होऊन गेलेल्या अनेक संत महात्म्यांना प्रत्येक समाज आता वाटून घेऊन त्यांचे नाव, त्यांच्या वृत्ती, शिकवणी, त्यांचा इतिहास हा आता यापुढे फक्त आपल्याच समाजापुरता पेटंट करुन घेणार की काय असा भास वृध्दींगत व्हायला लागलाय. कारण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना सध्याचे शिवाजी महाराज म्हणवले गेल्याने काही सामाजिक संघटनांच्या भावना दुखावल्या. एरवी समाजात चोविसा तास दारुपिऊन हिंदोडे घालणार्या एखाद्या व्यक्तिच नाव शिवाजी असेल आणि त्याला शिव्या घालण्यासाठी त्याच्या नावाचा कितीही अपभ्रंष केला तर शिवाजी या नावाचा एकेरी उल्लेख होणार नाही किंवा छ. शिवरायांच्या नावाचा अपमान होणार नाही असं काही शास्त्र किंवा भाकित आहे का हा एक नैतिकतेचा विषय असेल. त्याशिवाय समाजात महादेव नावाचा पारधी असो अन्य कोणी तो चोरी करण्यात माहिर असतो, अशा वेळी त्याला उपरोधिक बोलताना त्याच्याही नावाचा अपभ्रंष करुन त्याला एकेरीतून शिव्या घातल्या तर त्यामुळे प्रत्यक्षात देवादी देव महादेवांचाच अपमान समजून शिव्या घालणारांवर ही खटले भरुन चोराची बाजू घेणारे कायदे अस्तित्वात येतील. यात केवळ प्रातिनिधीक स्वरुपात ठरावीक ते नाव हे ठरावीक त्या संघटनांनी पेटंट करुन किंवा त्याचा कॉपिराईट करुन घेतल्यास भविष्यात आपल्या पाल्याच्या नावांना संत महात्म्यांची किंवा देवी देवतांची नावे देणे हे अवघडच ठरणार आहे.
उदाहरणा दाखल सांगायचे झाल्यास आजच्या परिस्थितीत अनेक संत महात्म्यांची नावे धारण केलेले नेते पुढारी अनेक अनिष्ठ, अप्रिय आणि गुन्हेगारी वृत्तींच्या प्रकरणात गोवली गेली आहेत. मग त्यांना लाभलेल्या संत महात्म्यांच्या वा देवी देवतांच्या नावामुळे त्यांच्यावर अशा गंभीर प्रकरणात असलेली प्रकरणे शिथील करुन त्यांना पुढील काळात देवी देवतांचा, संत-महात्म्यांचा दर्जा देऊन त्यांना पुजकत्व प्रदान करायला हरकत नाही. आहो एवढा विरोधाभास केवळ तुमच्या संघटनेच्या, समाजाच्या आणि काही वृत्तींच्या प्रसिध्दीपोटी किंवा राजकिय आकसापोटी केला जात असेल, जगात ख्याती प्राप्त महापुरुषांना तुम्ही केवळ तुमच्या पुरतंच बांधून ठेवत असाल तर मग त्यांच्या त्या समाजहिताच्या कार्याचा, बलिदानाला काय अर्थ..? तुम्ही ज्यांची वैश्विक ख्याती आहे अशांना केवळ ठराविक परिघात मर्यादित करणार असाल तर त्यांच्या महात्म्याला काय अर्थ उरणार आहे. आहो त्या महापुरुषांनी जी दर्यादिली दाखवून अखंड राष्ट्र निर्माणाचे कार्य केले आहे, उज्वल व सुसंस्कार समाज निर्माणासाठी जे बलिदान, त्याग केलेला आहे, समाजोध्दाच्या शिकवणी आणि संस्कृती निर्माण केलेल्या आहेत त्यांना एक प्रकारे बेड्या घालून त्यांना फक्त तुमच्यापुरतचं मर्यादित करणार का..? मान्य आहे समोरच्यानं शेण खाल्ल, त्यांची लायकी नसताना स्वतःला राजाच्या समान लेखण्याचं पातक केलं, पण तुम्ही आजपर्यंत एखाद्या, बेवड्या, दरोडेखोर वा पाकिटमाराला त्या महात्म्यांच्या नावापासून परावृत्त केलात का..? मग याचठिकाणी एवढं औदार्य दाखवून त्या जाणत्या राजाच्या महत्ततेला का वादांतिक केलात. यामुळं त्या जगोध्दारक जाणत्या राज्याच्या नावाला, ज्याच्या शिकवणीला, आणि त्याच्या इतिहासाकडं समाजानं यापुढं संशयी आणि तिरक्या नजरेनं बघण्यास का भाग पाडत आहात हेच कळत नाही. मान्य आहे त्यांच्याबद्दल तुमच्या मनात त्यांच्या शिकवणींचा, त्यागाचा, बलिदानाचा आणि त्यागाचा आदर आहे पण तो तुमच्या अशा वृत्तीमुळं संकुचित होऊन केवळ तुमच्यापुरताच लिमिटेड का करुन ठेवताय...? आपल्या देशातील अनादी काळापासूनच्या संत-महात्म्यांनी, महापुरुषांनी, माय, देश आणि धर्मासाठी आपले सर्वस्व झिजवले त्यांच्या त्या वृत्तीमुळं आपल्या संस्कृतीचा झेंडा अटकेपार गेला आणि आज पाश्चिमात्य देशांत आपल्या संस्कृतीचा उपासक वर्ग लाभत चालला असून आपल्याकडं मात्र पाश्चिमात्यीकरण होऊन केवळ घाणेरड्या राजकारणासाठी आमच्या संस्कृतीचे रक्षक हे केवळ ठराविक संघटना, समाज आणि व्यक्तिंपुरते मार्यादित व्हायला लागलेत हे मात्र खेदाने सांगावे वाटते.
मग त्यांच्या नावापुढं ही महाराज लावायचे का...?