लातूरात नाट्यगृह नामातंराचा वाद चिघळणार

भाजप झाले आक्रमक


लातूर/प्रतिनिधी :- परवा महानगरपालिकेत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्याकाळातील पहिलीच सर्वसाधारण सभा झाली यात लातूरकरांच्या विकासासाठी पहिल्या सर्वसाधारण सभेत ४७ कोटी रूपयांच्या विकास कामाना मंजूरी दिलेली होती.यातच शहरात उभारण्यात येणार्‍या नाट्यगृहास अटलबिहारी बाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव पूर्वीच मंजूर असतानासुद्धा तो ठराव रद्द करत याच नाट्यगृहास श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव घेतल्याने भाजप नगरसेवकासह कार्यकत्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली असून हा ठराव त्वरीत मागे घ्या.अन्यथा २६ जानेवारी रोजी होणार्‍या पालकमंत्र्याचा नागरी सत्कार होऊ दिला जाणार नाही.असा इशारा आज भाजपाच्या नगरसेवकांसह कार्यकत्यांनी बैठक घेवून महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना दिला असून याविरोधात जणआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे भाजपाच्या गोट्यातून सांगण्यात येत आहे. ऐकीकडे कॉग्रेसनगरसेवकासह सर्वच कॉग्रेस कार्यकर्ते मंत्री अमित देशमुख यांच्या नागरी सत्कारांच्या तयारीत आहेत.त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. लातूरात नाट्यगृह नामातंराचा वाद चिघळणार असल्याचे सद्यातरी चिन्ह दिसून येत आहे.
 शहरात उभारण्यात येणार्‍या नाट्यगृहास अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर असताना नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पहिला ठराव रद्द करत या नाट्यगृहास श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला . सत्ताधार्‍यांनी हा ठराव तात्काळ मागे घ्यावा अन्यथा प्रजासत्ताक दिनी होणारा पालकमंत्र्यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा भाजपाच्या वतीने आज बुधवारी झालेल्या बैठकीत देण्यात आला . या विरोधात जन आंदोलन उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला . 
शहरात नाट्यगृहाचे बांधकाम सुरू आहे . नाट्यगृहाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता . जागेअभावी नाट्यगृहाचे काम रखडलेले होते . हे काम तात्काळ सुरू व्हावे यासाठी त्यावेळी पालिकेसह राज्यात आणि केंद्रात सत्तेत असणार्‍या भाजपाने पुढाकार घेतला होता . तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पाठपुरावा करत हा प्रश्न सोडवत जागा उपलब्ध करून दिली होती . तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनीदेखील यात लक्ष घालत नाट्यगृहाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी मदत केली होती . 
नियोजित नाट्यगृहास भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव पालिकेने मंजूर केला होता . या नाट्यगृहातील एका दालनास श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचेही ठरले होते . परंतु नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केवळ महापौरांच्या अट्टाहासापोटी नाट्यगृहाचे नाव बदलून त्याला नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला . हे चुकीचे असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले . 
स्व.अटलबिहारी वाजपेयी हे पक्षातीत व्यक्तिमत्व होते . साहित्य क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती . त्यामुळेच त्यांचे नाव नाट्यगृहास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता . पालिकेने नाट्यगृहाचे नामांतर केल्याने स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर प्रेम करणार्‍या नाट्यप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे . 
पालिकेने नामांतर ठराव तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली. हा ठराव मागे घेतला नाही तर भाजपा याविरोधात जन आंदोलन उभारेल . प्रसंगी प्रजासत्ताकदिनी आयोजित करण्यात आलेला पालकमंत्री अमित देशमुख यांचा सत्कार सोहळाही होऊ देणार नाही ,असा इशारा या बैठकीत देण्यात आला .
या बैठकीस भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी , संघटन सरचिटणीस गुरुनाथ मगे , तुकाराम गोरे , शिरीष कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक , विविध आघाड्यांचे पदाधिकारी , कार्यकर्ते आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर प्रेम करणार्‍या नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
या विषयी गुरुवारी (२३ जानेवारी ) जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदन देवून मनपाने घेतलेला हा ठराव मागे घेण्याची मागणी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला .