लातूर (प्रतिनिधी):- अनेक भीमगीतांच्या माध्यमातून आयुष्यभर आंबेडकरी चळवळीला प्रोत्साहन देणार्या जुन्या काळातील गायिका सुषमादेवी मोटघरे यांची परिस्थिती अगदी हलाखीची आहे. त्यांची ही परिस्थिती पाहून लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृती समितीच्या पदाधिकार्यांनी सुषमादेवी यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आणि सत्कार सोहळा आयोजीत केला. यावेळी त्यांना खा.सुधाकर शृंगारेेंच्या हस्ते दीड लाखांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. मूळच्या कल्याणच्या असणार्या सुषमादेवी यांची कौटुंबिक परिस्थिती पाहून त्यांचा सन्मान करून मदत करण्याचा निर्धार करण्यात आला होता. लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त भीमगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीते गात सुषमादेवी यांनी लातूरकरांची मने जिंकली. राज्यभर गायनाचा कार्यक्रम करूनही उतारवयात सुषमादेवी यांना उपेक्षितांचे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळेच लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृती समितीमधील पदाधिकार्यांनी त्यांच्या घरची स्थिती पहिली आणि त्यांना मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांना दीड लाखांचा धनादेश आणि कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांनाकडून मिळणारी मदत सुपूर्द करण्यात आली.मराठवाडा विद्यापीठ नामांतराचे औचित्य साधून भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या उपस्थितीत सुषमादेवी मोटघरे यांना दीड लाखांचा धनादेश आणि सन्मानपत्र देण्यात आले. त्यामुळे लातूरकरांच्या या माणूसकीच्या पॅटर्नमुळे सर्वजण भारावून गेले. यावेळी बोलताना सुषमादेवी यांनी, आपण लातुरकरांचे कायम ऋणी राहू, अशी भावना व्यक्त केली.
भीमगीत गायिका सुषमादेवींना दिला खा.सुधाकर शृंगारेेंच्या हस्ते दीड लाखांचा धनादेश