शहीद जवान सुरेश चित्ते अमर रहेच्या घोषणांनी गावकर्यांनी दिला निरोप
लातूर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील औसा तालूक्यात असलेल्या गावचे सुपुत्र सुरेश चित्ते हे जम्मू काश्मिर मध्ये सियाचीन येथे सैन्यामध्ये कर्तव्य बजावत असताना शहीद झाले होते त्यांचे पार्थिव आज शुक्रवारी सकाळी अलमला गावात दाखल होताच गावकर्यांनी अमर रहे,अमर रहे,शहीद जवान सुरेश चित्ते अमर रहे, वंदे मातरम,भारत माता की जय असा जय घोष करत संपूर्ण गावच्या रत्यावर रांगोळी काढून त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव केला.दुपारी शहीद जवान सुरेश चित्ते यांच्यावर अलमला येथील रामनांथ शिक्षण संस्थेच्या मैदानात लष्करी इतमामात अंत्यत शोकाकुळ वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.यावेळी त्यांच्या दोन जुळ्या मुली व तानुला मुलगा लष्कराने काखेत घेवून वडीलाचा चेहरा दाखवताना अलमलाकरांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहताना पाहिला मिळाल्या यावेळी औसा तालूक्यासह लातूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती.
औसा तालुक्यातील आलमला येथील सुरेश गोरख चित्ते हे जम्मू- काश्मिरमधील सियाचीन भागात बटालियनमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते़ त्यांची १४ वर्षांपासून लष्करात सेवा झाली होती़ कर्तव्य बजावत असताना ते मंगळवारी शहीद झाले़ शुक्रवारी सकाळी ८़२० वा़ शहीद जवान सुरेश चित्ते यांचे पार्थिव आलमला येथे आणण्यात आले़ गावच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी गावातील नागरिक पहाटेपासूनच रस्त्यावर थांबले होते़ दरम्यान, घरापासून ते रामनाथ शिक्षण संस्थेच्या प्रांगणापर्यंत जवळपास दोन ते अडीच किमी अंतरावर महिलांनी रांगोळी काढली होती़
सकाळी ९ वा़ गावातील मुख्य चौकात श्रध्दांजली वाहण्यात आली़ त्यानंतर अंत्यदर्शनास नागरिकांची रीघ लागली़ ११़३० वा़ पासून फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा निघाली़ यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हाती ५० मीटर लांबीचा तिरंगा ध्वज होता़ तसेच टाळ- मृदंगाच्या गजरात वारकरी संप्रदाय होता़ गावातील प्रत्येक महिलांनी शहीद सुरेश चित्ते यांना औक्षण करुन दर्शन घेतले़ रामनाथ शिक्षण संस्थेच्या प्रांगणात ही अंत्ययात्रा पोहोचली़
त्यांच्या पार्थिवास त्यांचा लहान बंधू धीरज चित्ते यांनी भडाग्नी दिला़ यावेळी त्यांच्यासोबत शहीद सुरेश चित्ते यांचा ६ वर्षीय मुलगा आदर्श होता़ शोकाकुल वातावरणात शहीद चित्ते यांना अखेरचा निरोप देण्यात आला़ शहीद जवान सुरेश चित्ते यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे़
यावेळी अहमदनगर येथील लष्कराचे कॅप्टन अजय फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना देण्यात आली़ तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ राजेंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने मानवंदना दिली़ यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वतीने पाठविण्यात आलेल्या शोकसंदेशाचे वाचन मोईज शेख, श्रीशैल्य उटगे यांनी केले तर माजी मंत्री आ़ संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वतीने पाठविण्यात आलेल्या शोकसंदेशाचे वाचन ज़िप़चे समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी केले़ यावेळी आ़ अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ विपीन ईटनकर, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह हजारो नागरिकांची उपस्थिती होती़.
तानुल्या बाळाला लष्कराने दाखवला वडीलांचा चेहरा
शहीद जवान सुरेश चित्ते यांना दोन जुळ्या मुली असून एक काही महिन्याचा लहानगा मुलगा आहे.वडील चित्ते शहीद झाल्यानंतर त्याचे पार्थिव अलमला गावात अंत्यसंस्कारासाठी आणल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते त्या ठिकाणी सोबत आलेल्या लष्करी जवानांनी सुरेश चित्ते यांच्यावर अंत्यसंस्कार करताना तानुले बाळ काकेत घेवून लष्कराने चित्तेवर असलेल्या वडीलांचा चेहरा दाखवला पण त्या तहानुल्या बाळाला आपले वडील अखेरचा निरोप देवून जात आहेत ते काय समझणार यावेळी मात्र गावकर्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
औसा शहरातील व्यापारांनी बंद पाळला
औसा येथील व्यापारी संघटनेतर्फे शहीद जवान चित्ते यांना आंदराजंली म्हणून सकाळ पासून सर्व आपली दुकाने बंद करून तसेच औसा टी पांईट,हनुमान चौक येथे समस्त औसेकर यांनी श्रध्दांजली वाहिली.
सैन्यातर्फे चित्ते यांना मानवंदना
सुभेदार-सुखबीर सिंह, नायक शेंडगे शाम ,प्रदीप कुमार ,भाल सिंह रवींद्र सिंह,हरमनदीप सिंह, शिपाही सुमित सिंह,रजत राय,राजू केव्ही,सनुप ऐ,सलमान सिद्दिकी,एन श्रीनिवास, लखवीर सिंह, शक्ती सिंह.तसेच जिल्हा सैनिक अधिकारी ओमकार कापले,माजी मेजर मस्के, सुभेदार दयानंद रसाळ, हवालदार संजय चिमणे,कँप्टन महादेव कांबळे, राम शिंदे यांनी मानवंदना केली.