स्मारके आणि पुतळ्यांबद्दल साधं बोलणं सुध्दा आपल्याकडं पातक ठरतं. कारण स्मारकांच्या आणि पुतळ्यात असणार्या महात्म्यांचा आणि महापुरुषांचा इतिहास, शिकवणी, आचार, विचारांपेक्षा केवळ त्यांच असणं हेच आमच्यातल्या राजकारणासाठी महत्वाचं आहे. आणि याबद्दल कोणी बोलत असेल त्याला दाबण्याचा किंवा वेळप्रसंगी त्याचे अस्तित्व नष्ठ करण्याचा सुध्दा प्रयत्न आमच्यातील राजकारण्यांकडून करण्याची दानत पोसली जाते, ती ही सर्व सामान्यांच्या मताच्या जोरावरच. कारण आमच्याकडं संत, महात्मे, महापुरुष यांचे पुतळे आणि स्मारके ही केवळ मतांचा जोगवा मागण्या पुरताच केला जातो. त्यांचे आचार विचार हे केवळ पुतळे आणि स्मारकांच्या उद्घाटनाच्या वेळी म्हणजे त्यादिवशी आपल्या पीएने लिहून दिलेल्या भाषणापुरतेच कामाला येतात. असो ही त्याच रामराज्यातील शोकांतिका आहे ज्याचा आदर्श जगातील अनेक लोक घेतात. परंतू आज मुंबई शहरात सर्वोत्तम सेवा देणार्या वाडीया रुग्णालयाची दुरावस्ता केवळ निधी अभावी होत असल्याने रुग्णांना न्यायालयात धाव घ्यावी लागते आणि त्याच्या प्राथमिक गरजा पुर्ण करण्यासाठी न्यायालयांनी राज्यसरकारच्या कानपिचक्या घ्याव्या लागतात यापेक्षा आणखी काय वाईट पहायला मिळणार आहे. तर दुसरीकडं जगात सर्वाधिक स्मारके भारतात असल्याचं बोललं जातय. असतील - नसतील तो विषय संशोधनाचा आहे पण स्मारकांच्या रुपाने आपल्या महापुरुषांच्या आणि महात्म्यांबद्दल असलेली अस्मिता कायम ठेवण्यासाठी, तसेच त्यांचा इतिहास, त्यांचे आचार-विचार यांच्या पुनःरुजीवनासाठी त्यांची नितांत गरज आहे हे ही तितकेच खरे. असे असले तरी स्मारकांची आवश्यकता ही सध्या अस्तित्वा असलेल्यांपेक्षा अधिक नसावी हे ही तितकेच खरे. परंतू आपल्याकडं सध्यातर स्मारके आणि पुतळ्यांची जणू स्पर्धाच लागलीय. एकाने १० फुटी पुतळा उभारला तर दुसरा लगेचच ५० फुटी पुतळा उभारण्याच्या मागे लागलेला असतो. आता ही स्पर्धा सामान्य जनतेसाठी उंची पुरतीच असते परंतू उभारणार्यासाठी मात्र त्या पुतळ्यासाठी आणि स्मारकासाठी घोषीत केलेल्या निधीतून मिळणार्या कमिशनसाठीची असते ही खरी बाब आमच्याकडची भोळीभाबडी जनता ओळखू शकत नाही. आणि ओळखलं तरी आमच्याकडचे भाभडे (भडवे) कार्यकर्ते मात्र जनतेच्या तोंडावर पोतरा फिरवण्यासाठी वरुन म्हणतील सुध्दा की तळं राखणारा पाणी प्यायला दुसरीकडं जाईल कशाला...? म्हणजे आरे बाबा पण हा तळ राखणारा तर तळ्याच्या नावानं आपल्याला पुतळ्याचा डोंगर उभा करुन देतोय हे विरोधाभासी चित्र कोणीच पाहणार नाही. असो माझा विषय केवळ पुतळ्यांच्या आणि स्मारकांच्या विरोधासाठी नाही तर त्यांच्या असण्याच्या समर्पकतेचा आहे. माझा विरोध स्मारके आणि पुतळ्यांच्या बलाढ्यतेचा आणि त्यांच्या फोफावत चाललेल्या अस्तित्वाबद्दलचा आहे. मान्य आहे की तुम्ही पुतळे आणि स्मारके उभा करा पण किमान लोकांच्या नजरेत बसावी एवढीच, नाकी पुतळ्यांच्या आणि स्मारकांची भक्तांनी दिवसभर पुतळ्यांपाशी किंवा स्मारकांपाशी घालवून रात्री तेथेच रेव्हपार्टी, किंवा दारूच्या पार्ट्यांसारखे प्रकार करावेत यासाठी. स्मारके आणि पुतळ्यांच्या माध्यमातून तुम्ही त्यांचे अस्तित्व, त्यांचा इतिहास, त्यांचे आचार - विचार, शिकवणी तेवत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहात. हे करत असताना हाही विचार करा की, सध्याच्या घडीला त्या पुतळ्या आणि स्मारकांपेक्षा सर्वात जास्त गरज आहे समाजातील दूर्लक्षीत घटकांच्या पालन पोषणाची. आत्ता तुम्ही त्यांच पालन पोषण करण्यापासून परावृत्त नाहीत हे मान्य आहे, पण निवडणूकी आगोदर आणि निवडणूकीच्या विजयानंतरच्या त्या पालन पोषणापेक्षा वेगळं पालन पोषण ही आपल्याकडूनच अपेक्षीत असतं. ते म्हणजे समाजातील शिक्षणापासून वंचित राहणार्या मुलांना स्मारकांच्या आणि पुतळ्यांच्या ऐवजी त्यांच्याच नावाने शाळा काढून किंवा समाजातील दूर्बल घटकांतील नागरिकांसाठी महात्म्यांच्या किंवा महापुरुषांच्या नावने दवाखाने काढून त्यांची सेवा सुश्रूषा झाली तर खर्या अर्थाने त्या महापुरुषांच्या आणि महात्म्यांच्या जीवन समर्पना खरा अर्थ प्राप्त होणार आहे.
नाहीतर आज आमच्याकडं समुद्रात, किंवा समुद्रतिरावर सुध्दा जगातील सर्वात उंच पुतळे आणि स्मारके उभारण्याच्या स्पर्धाच लागलेल्या आहेत. राफेल टॉवर पेक्षा अधिक उंच म्हणजे जवळपास ६०० फूट उंच सरदार वल्लभ पटेलांचा पटेलांचा पुतळा २९.९ अब्ज रुपये खर्च करुन उभारण्यात आला. तर छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक हे १,४००,००० चौरस फुटात उभारले जाणार आहे. यासाठी २५००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. आता याला विरोध केला तर कदाचित तिसरं महायुध्द सुध्दा होऊ शकतं ते ही भारता बाहेर नाही तर भारतातच. आता हा उपहासात्मक विचार झाला पण सापेक्ष विचार असा की, ही स्मारके उभारुन छ. शिवरायांप्रति महाराष्ट्रातील जनतेचे असणारे प्रेम व्यक्त होईल, त्याशिवाय त्यांच्या प्रति असणारी आस्था, त्यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेला चालना मिळेल. परंतू शिवरायांनी संकल्पीलेल्या स्वराज्याचं काय...? ज्या शिवरायांनी आपल्या सकल राज्यात कधीही कोण्या माता भगिनीवर कोणाची वाईट नजर पडू दिली नाही, त्यांच्या राज्यातील बळीराजाला परक्यांकडून कसलाच त्रास होणार नाही, किंवा दुष्काळी स्थितीत सुध्दा कधी कोणत्या शेतकर्याला उपाशी मरण्याची किंवा कमी अधिक उत्पन्नामुळे आत्महत्या करण्याचे वेळ येऊ दिली नाही. किंवा त्याला कोण्या परकिय शक्तींकडून कसलाच त्रास होणार नाही याची दक्षता घेतली, त्याशिवाय शत्रुच्या छबीण्यातून हिरावून आणलेल्या बेगमला आपली बहीण समजून तिला साडीचोळीचा आहेर केला हा धैर्यवान इतिहास आमच्या शिवरायांचा आहे. पण त्यापुढे जाऊन छ. शिवरायांच्या त्याच सुराज्याचे पुनःरुजीवन व्हावे त्यांच्या ह्या वृत्ती आमच्या सुराज्यात अस्तित्वात येतील अशा अपेक्षा व्यक्त करुन केवळ त्यांची आश्वासनेच मिळतील आणि त्यांच्या उपासकांकडून केवळ सुराज्याच्या नावाखाली सर्व सामान्य जनतेचा धिर खचवण्याचे आणि आरेरावीचे राजकारण होऊ नये ही अपेक्षा ठेवणेच क्रमप्राप्त आहे. नाहीतर शिवरायांच्या नावावरुन राजकारण करत मुळ विकासाच्या मुद्यांवरुन जनतेचे लक्ष विचलीत करुन वेळ मारुन नेण्याचे काम यांनी परंपरेनुसार करु नये हिच अपेक्षा...
स्मारके समर्पक असावीत...