ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री अवैध दारू विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी

लातूर, दि. २१ :  लातूर शहरापासून जवळच असणार्‍या बाभळगांव  परिसरातील अनेक ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जात असून त्यामुळे तरुणाईमध्ये व्यसनाधिनता  वाढत चालली आहे. अशा प्रकारच्या अवैध दारू विक्रीवर तात्काळ निर्बंध आणावेत अशी मागणी जागरूक नागरीकातून केली जात आहे. 
बाभळगांवच्या आसपास सगळीकडे हॉटेल - ढाब्यांचे प्रस्थ वाढीस लागले आहे. या ढाब्यांवर जेवणाबरोबर मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्रीही खुलेआम केली जात आहे. ढाब्यांवर जेवणासाठी येणार्‍या ग्राहकांना त्याच ठिकाणी त्यांना हवा असलेला दारूचाही पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु आहे. बाभळगांव  प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर असलेल्या सस्पेन्स नावाच्या ढाब्यावर  तर अवैध दारूबरोबर अवैध हुक्का पार्लरही चालवले जाते. या हुक्का पार्लर वर लातूर शहर व परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थिनींची ये - जा मोठ्या प्रमाणात होत असलेली पाहावयास मिळते. विशेष म्हणजे हा ढाबा चालवणार्‍या चालकापैकी एकाचे वडील पोलीस खात्यात नोकरीला आहेत तर अन्य एकाचे वडील स्थानिक पुढारी आहेत. म्हणजेच तरुण पिढीला व्यसनाच्या खायीत  लोटण्याचे काम या ढाबा चालकांकडून खुलेआमपणे केले जात आहे. हे सर्व प्रकार बिनबोभाट चालू असून त्याकडे पोलीस प्रशासन हेतुतः डोळेझाक करीत असल्याचे जाणवते. केवळ याच ढाब्यांवर हे प्रकार चालतात असे नव्हे तर परिसरातील एक आठवण, डायमंड ढाब्यांवरही अवैध दारू विक्री केली जाते.
  अशा प्रकारच्या अवैध दारू विक्रीवर तात्काळ निर्बंध आणावेत व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावातील जागरूक नागरिकांतून  केली जात आहे.