मागील अडीच वर्षांचा निर्माण झालेला बॅकलॉग भरून काढत सत्तांतरीत होऊन नियुक्त कॉंग्रेसचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर महानगर पालिकेत कामांचा विक्रांत धडाका सुरु केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या कार्यकाळातील पहिल्याच सर्वसाधारण सभेत महापौरांनी आपली ही कामगिरी दाखवून लातूरकरांना तब्बल ४७ कोटींच्या विकासकामांची भेट दिली आहे. याच बरोबर त्यांनी मनपातील प्रलंबित १८ विषयांना मंजुरी दिली आहे. पाच तास चाललेल्या या सभेत पूर्वाश्रमीचे सत्ताधारी आणि आत्ताच्या विरोधकांना केवळ बघ्याचीच भूमिका घ्यावी लागली. या सर्वसाधारण सभेत सर्वच सदस्यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करून विषय पत्रिकेवरील १८ विषयांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो शासनाकडे पाठवण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. नियोजित नाट्यगृहास नटवर्य श्रीरामजी गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासोबतच खोरी गल्लीतील मनपा शाळा क्रमांक ६ मध्ये अल्पसंख्यांक वसतीगृह उभारण्याचा निर्णय घेत ती जागा हस्तांतरित करण्याचा निर्णयही सभेतच घेण्यात आले. सोमवारी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेत सर्वसाधारण सभा झाली . गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेत होणारी ही पहिलीच सभा असल्याने सर्वांचेच लक्ष या सभेकडे लागले होते . विषय पत्रिकेवर १८ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते . गत अडीच वर्षात शहराचा विकास अपेक्षित गतीने झाला नाही .त्यामुळेच विकासकामांबाबत महापौर गोजमगुंडे कोणते निर्णय घेतात याची उत्सुकता लागलेली होती . विविध ठरावांच्या माध्यमातून शहरात जवळपास ४७ कोटी रुपयांची विकासकामे नव्याने सुरु करण्याचा निर्णय घेऊन ही कामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश महापौरांनी दिले . या माध्यमातून मागील अडीच वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मनपाचा स्वतःचा पशुवैद्यकीय दवाखाना (डॉग क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय घेत शहरवासियांना होणारा मोकाट कुत्र्यांचा त्रास कमी करण्यात येणार आहे . शहरातील कचरा संकलन केल्यानंतर तो डेपोवर नेण्यात येतो . डेपोची सध्याची जागा अपुरी पडत असल्याने एमआयडीसीमध्ये नवी जागा मागणीचा निर्णय घेत तो प्रस्ताव तात्काळ पाठवण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला . पंतप्रधान आवास योजना राबवण्यासाठी नांदेड रस्त्यावर असणार्या शासकीय गोडाऊनची जागा मागण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला . शहरातील वाहनधारकांची पार्किंगची होणारी गैरसोय लक्षात घेत अद्ययावत पार्किंग व्यवस्था लवकरच उभारण्यात येणार असून यासाठीचे धोरण या सभेत निश्चित करण्यात आले. तसेच मनपाच्या शाळा, सामाजिक संस्थासह नामांकित महाविद्यालयांना व व्यापार्यांना दत्तक देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. चौदाव्या वित्त आयोगातून स्वच्छता विभागासाठी आवश्यक वाहने व उपकरणे खरेदी करण्याचा ठराव मंजूर करुन दूरदृष्टीने व कमी खर्चात स्वच्छतेची कामे करण्यास प्राधान्य देण्यात आले. प्रभाग समिती क्षेत्राची पुनर्रचना करून या समित्या लवकरच अस्तित्वात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील काळात मलनिस्सारण योजना राबवण्यासाठी निविदा प्रक्रिया झालेली होती. मात्र यासाठी आलेली निविदा अधिक दराची असल्याने पालिकेवर २७ कोटी रुपयांचा अधिकचा बोजा पडणार होता. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करून नव्याने अद्ययावत व नवीन तंत्रज्ञानाने विकसित योजनेचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकनेते कै. विलासराव देशमुख मार्गाच्या मधोमध पथदिवे बसवून हा रस्ता गुळमार्केट पर्यंत वाढविण्यास सदस्यांनी मंजुरी दिली. शहरातील विविध चौकांना महापुरुषांची नावे देण्यात आलेली आहेत. ही नावे सन्मानाने घेता यावीत यासाठी त्या चौकांचे पूर्ण नावात नामकरण करत तसे फलक लावण्याचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला.
लातूर गावभागासह नव्याने विकसित झालेल्या वस्त्या, गोलाई परिसराच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा बनवण्यासाठी शासनाकडे विशेष निधीची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला. यासोबतच गेल्या अडीच वर्षात अस्तित्वात न आलेली वृक्ष समिती स्थापन करण्याच्या निर्णयाला मंजुरी देत समितीतील सदस्य संख्या १५ अशी ठरवण्यात आली. या सारख्या विविध विकासाच्या विषयांना या सभेत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. सभेच्या प्रारंभी लातूरचे सुपुत्र आ. अमित देशमुख यांची मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड होऊन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल व मुंबई ईस्टर्न वे ला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्याबाबत राज्याचे मंत्री अजित पवार तसेच राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. त्याशिवाय लातूरकरांवर ऋण असलेल्या वा लातूरच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणार्या लोकनेते कै. विलासराव देशमुख यांचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देन्याबाबत शासनास पुनश्च शिफारस करण्याचा ठराव या सभेने मंजूर केला. लातूरच्या विकासात कै. देशमुख यांचे कधीही न विसरता येणारे योगदान असल्याने त्यांचेच नाव या महाविद्यालयास द्यावे असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. त्याशिवाय लातूरसह परिसरात नाट्यकलेला पुनरूज्जीवीत करणार्या नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांचे नाट्यगृहास नाव देण्याचाही निर्णय घेऊन लातूर शहरात नाट्यगृहाचे बांधकाम गतीने सुरू करणारा ठराव सभेने एकमताने मंजूर केला. लातूरच्या सांस्कृतिक जडणघडणीत कै.श्रीराम गोजमगुंडे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याची पुढच्या पिढयांना माहिती व्हावी यासाठी नाट्यगृहास नाव देण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली. तसेच अनेक वर्षांपासून अल्पसंख्यांक योजने अंतर्गत वसतीगृह बांधकामाचा प्रश्न प्रलंबित होता. या सभेत त्या विषयावर चर्चा होऊन एमएसडीपी अल्पसंख्यांक योजने अंतर्गत खोरी गल्लीतील मनपा शाळा क्रमांक ६ येथे वसतीगृह बांधण्याचा निर्णय घेत त्यासाठी ही जागा संबंधित विभागाकडे हस्तान्तरित करण्याचे पत्रही देण्यात आले. अशा या लातूरच्या जनतेसाठी धडाडीचा ठरणारा महापौर खरोखरच अभिमानाची बाब आपल्या कार्याच्या रुपाने समोर येत आहे. विक्रांतजी गोजमगुंडेंच्या धडाडीच्या कार्याला आणि त्यांच्या हस्ते होणार्या लातूरच्या भरभराटीला शुभेच्छा...
मनपात कामांचा विक्रांत धडाका