उदगीर तालूका होणार जिल्हा?

मुख्यमंत्र्याच्या सुचनेनुसार आयुक्तांनी दिले प्रस्ताव पाठवण्याचे आदेश 



 लातूर :- लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा महसुली तालुका तसेच महाराष्ट्राच्या सिमेवरील सर्वात मोठे शहर म्हणून परिचीत असलेल्या उदगीर तालुक्याला अखेर जिल्ह्याचा दर्जा देण्याचे संकेत निर्माण झाले आहेत.
 सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या उदगीर जिल्हा निर्मितीच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल सरकारनं उचललं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या विभागीय बैठकीत सूचना दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्ष जिल्हा निर्मितीचं स्वप्न पाहाणार्‍या उदगीरवासीयांसाठी आशेचा किरण निर्माण झालाय.
 मराठवाड्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ आणि १० जानेवारी रोजी औरंगाबाद, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल आढावा बैठक बोलवली. औरंगाबाद येथे झालेल्या  या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लातूर आणि नांदेड जिल्ह्याचं विभाजन करून उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्देश देताच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली आहे. उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव आणि उदगीर येथे प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त केंद्रेकरांनी दिल्यानं सीमावर्ती भागाला लागून असलेल्या उदगीरच्या जिल्हा निर्मितीची आशा पल्लवीत झाली आहे.
 अंबाजोगाई, उदगीर जिल्ह्याची मागणी
 मराठवाड्याचा विकासाचा मोठा अनुषेश कायम आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचं विभाजन करून अंबाजोगाई या जिल्ह्याची निर्मिती करावी तर नांदेड आणि लातूर जिल्ह्याचं विभाजन करून उदगीर जिल्हा निर्माण करावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. गेल्या तीस वर्षात सहा मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती करू असं आश्वासन दिलं पण आजही जिल्हा निर्मितीची मागणी शासन दरबारी रखडलेली आहे. उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचाली सुरु झाल्यानं आता अंबाजोगाईची मागणीही जोर धरू शकते


विदर्भाला हवेत ११ जिल्हे
विकासाची गती वाढविण्यासह जिल्हा प्रशासन प्रत्येक गावापर्यंत पोहचण्यासाठी लहान जिल्ह्यांचा पर्याय आहे. त्याच अनुषंगानं विदर्भातील मोठ्या जिल्ह्याचं विभाजन करण्याची मागणी गेली अनेक दशकं सुरु आहे. विदर्भातील चंद्रपूर, दुर्गम असा गडचिरोली, बुलडाणा, अमरावती असे भौगोलिकदृष्ट्या मोठे जिल्हे आहेत. त्यामुळे विकासाला अनेक मर्यादा येतात. म्हणूनच विदर्भात ब्रह्मपुरी, चिमूर, अहेरी, काटोल, अचलपूर, पुसद, आष्टी, खामगाव असे नवे ११ जिल्हे निर्माण करावेत अशी मागणी सातत्यानं केली जातीय.


जिल्हा निर्मितीचा इतिहास
१६ ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचं विभाजन करून लातूर जिल्ह्याची निर्मिती लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर आणि उदगीर असे १० तालुके