लातूर, दि. 30 – संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी लिहिलेल्या ग्रंथातील प्रत्येक ओवीत मोठा भावार्थ दडलेला असून जगातील खरा समाजवाद हा ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत आणि तुकारामांच्या गाथेत दडलेला आहे. या थोर संतांचे तत्वज्ञान समाजापर्यंत नेऊन भारतीय संस्कृती पुढे नेहण्याचे काम प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे करीत आहेत. आता गाथ आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथातील तत्त्वज्ञान जगाच्या पटलावर पोहचविण्यासाठी माध्यमांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा स्तंभ लेखक, कृषि अभ्यासक तथा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. मुकुंदराव गायकवाड यांनी येथे व्यक्त केली.
लातूर तालुक्यातील मानवतातिर्थ रामेश्वर (रुई) या गावास भेट देऊन पाहनी केल्यानंतर प्रा. मुकुंदराव गायकवाड यांनी गुरुवारी लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकिय महाविद्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड, प्रगतीशिल शेतकरी काशिराम दा. कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड, अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, विष्णु भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. मुकुंदराव गायकवाड म्हणाले, मला डॉ. विश्वनाथ कराड यांच्यामुळे ज्ञावेश्वरी आणि गाथा हे ग्रंथ वाचता आले. गाथा आणि ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञान जगासमोर मांडण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून डॉ. विश्वनाथ कराड हे निष्ठेने करीत आहेत. आता या दोन्ही ग्रंथातील तत्वज्ञान जगासमोर मांडण्याचे काम पत्रकारांकडून व्हावे. जगातील 50 पेक्षा अधिक देशांना मी भेटी दिल्या मात्र डॉ. विश्वनाथ कराड यांच्यासारखा सेवाभाव कुठेही पहावयास मिळाला नाही. शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना ते विज्ञान आणि आध्यात्माच्या माध्यमातून समाजातील आंधश्रध्दा दूर करण्याचे काम करीत आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी माईर्स एमआयटीच्या माध्यमातून त्यांनी दर्जेदार शिक्षणाचा ब्रँड प्रस्थापीत केल्यामुळे मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, आसाम आदी राज्यांनी त्यांना शिक्षण संस्थेसाठी जमीन दिलेली आहे. त्यांनी राजबाग, लोणी काळभोर पुणे येथे जगातील एकमेव सर्वात मोठा घुमट उभा करुन वास्तुशिल्पाचा अद्भूत नजारा पेश सादर केला आहे. रामेश्वर या जन्म गावी राम मंदिर, मस्जिद, दर्गा, बुध्द विहार व राम-रहिम सेतू उभा करुन धार्मीक एकात्मतेचे मुर्तीमंत उदारणही त्यांनी समाजासमोर निर्माण केले आहे.
देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर मराठी पत्रकारांचा दबदबा निर्माण व्हावा यासाठी आपल्या पत्रकारांनी मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी या भाषेत लिखाण करणे गरजेचे आहे. पाश्चिमात्य पत्रकारीतेप्रमाणे आपले लेखन दखलपात्र व्हावे यासाठी मराठी पत्रकारांनी अभ्यासपुर्ण लेखणावर भर देऊन देशाच्या जडणघडणीत आपली लेखणी कशी उपयोगी ठरेल या दृष्ठिने प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही प्रा. गायकवाड यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले की, ज्ञान आणि विज्ञानाचा अंश हा भारतीय संस्कृतीत दडलेला आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, शांती व समाधान नांदेल आणि माझी भारतमाता 21 व्या शतकात ज्ञानाचे दालन आणि विश्वगुरु म्हणून उदयास येईल असे भाकीत भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंदानी केले होते. त्याप्रमाणेच आज आपल्या देशाची वाटचाल सुरु आहे. राजबाग, लोणी काळभोर पुणे येथे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या नावे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या माध्यमातून वैश्वीक भारतीय संस्कृतीचे दर्शन जगाला होत आहे. विश्वशांती आणि मानवतेचा संदेश या घुमटाव्दारे दिला जाईल असेही ते म्हणाले.