लातुरात बँक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन संपन्न; उद्या मोर्चा निघणार

सरकारच्या ताठर भूमिकेमुळेच संप अटळ बनला...!- कॉ. धनंजय कुलकर्णी

लातूर दिनांक 30 - युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या देशव्यापी बँक कर्मचारी अधिकारी संघटनेने देशभरात दिनांक 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी अशा दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे. सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी देशातील 10 लाख बँक कर्मचारी अधिकारी संपावर आहेत. दिनांक 27 जानेवारी 2020 रोजीच्या वेतन सुधारणे संबंधीच्या वाटाघाटी चर्चेत केंद्र सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच दोन दिवसीय संप अटळ बनला आहे, असा आरोप बँक कर्मचाऱ्यांची नेते कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी केला. 

 

देशातील दहा लाख बँक कर्मचारी अधिकारी हे प्रलंबित वेतनवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लातूरमधील बँक कर्मचाऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखेसमोर धरणे आंदोलनाद्वारे संप साजरा केला. सदरील धरणे आंदोलनात कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सरकारची चुकीची आर्थिक धोरणे व बँकांच्या तोट्याची विश्लेषण केले. सद्यस्थितीत सरकारी बँका ह्या तोट्यात आहेत ही वस्तुस्थिती आहे पण त्या मोठ्या उद्योगातील थकीत कर्जापोटी कराव्या लागणाऱ्या तरतुदी मुळेच आणि हेच नफा-तोटा चे प्रश्न पुढे करत सरकार  बँक कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीवर निर्णय घेण्यास तयार नाही. थकीत कर्जापोटी कराव्या लागणाऱ्या तरतुदी मुळेच बँका ऑपरेटिव प्रॉफिट मध्ये असतानादेखील शेवटी तोट्यात गेल्या आणि ही सर्व मोठी कर्जे बँकांच्या वरिष्ठ कार्यचालक व सरकारमधील राजकारणी यांच्या संगनमतातून मंजूर झालेली आहेत. याचाच आधार घेऊन बँक कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागण्या नाकारल्या जात आहेत असा आरोपही त्यांनी केला. सरकारच्या चुकीच्या धोरणाविषयी बोलताना पुढे ते म्हणाले की, नोटबंदी जीएसटी सारख्या आर्थिक धोरणामुळे आजचे बँकिंग अडचणीत आले आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात सरकारने जनधन, आधार, विमा योजना, पेन्शन योजना, मुद्रा कर्ज, पंतप्रधान आवास योजना या प्रत्येकाच्या अंमलबजावणीत बँकांची भूमिका वाढली असताना बँकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मृत्यू, राजीनामा, सेवानिवृत्ती यामुळे रिकाम्या झालेल्या जागा भरल्या जात नाहीत आणि त्यामुळेच कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर पुरेशी पगारवाढ हा आमचा हक्क बनतो असे त्यांनी सांगितले. म्हणूनच हक्काचे वेतन मागून मिळत नसेल तर झगडून मिळवणे हेच या दोन दिवसीय संपाची प्रयोजन आहे असे सांगत त्यांनी संपाविषयी ची भूमिका स्पष्ट केली. संपकाळात आपल्या न्यायिक मागण्या जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

सरकारच्या या आडमुठे धोरनाला लातूर शहरातील बँक कर्मचारी अधिकाऱ्यांनी विरोध केला. या निमित्ताने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात स्टेट बँक कर्मचाऱ्यांची नेते कॉ. प्रशांत धामणगावकर यांनी सध्याचा बँकिंग व्यवसाय संकटात असल्याचे सांगत सरकारने बँक कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेतले तर नक्कीच या संकटातून बाहेर पडता येईल असे मत व्यक्त केले. तसेच कॉ. दरेकर यांनीही बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन करू असे ईशारा दिला.  सदरील धरणे आंदोलनात लातूर शहरातील तरुण कर्मचारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

बँक कर्मचाऱ्यांच्या आजच्या या धरणे आंदोलनास शेतकरी कामगार पक्षाचे भाई उदय गवारे, काँग्रेसचे श्री मोइन शेख, मराठवाडा व्यापारी महासंघाचे श्री दिनेश गिल्डा, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबनराव जी भोसले यांनी पाठिंबा दिला.