'ती' आजही असुरक्षित आहे..!
'ती' आजही असुरक्षित आहे. तिला कोणी भररस्त्यात जाळुन मारत आहे, तिला कोणी छळुन मारत आहे, तिचा कोणी गळा घोटत आहे, तिच्यावर कोणी अॅसिड टाकत आहे. एकिकडे स्त्रीमुक्तीचा नारा देत 'बेटी बचाव बेटी पढाव' च्या घोषना देणारा समाज तर दुसरीकडे तिला जाळणारा समाज अशी अवस्था निर्माण झाली. गेल्या काही वर्षांपासून महिला अत्याचारांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पुरुषसत्ताक संस्कृतीने स्त्रीचा गळा घोटला गेला आहे. समाजात आपण पाहिलं तर लक्षात येईल कि लहान, कोवळी, निर्दोष बालके सुद्धा असुरक्षित आहेत. हिंगणघाट या वर्धा जिल्ह्यातील  शहरात एका गजबजलेल्या चौकात तरुणीला जिवंत जाळलं जातं ही या पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना आहे. एवढी भीषण घटना घडली याचा विश्वास या चौकातील आजूबाजूच्या दुकानदारांनाही बसत नाही. सकाळी सव्वा सातच्या सुमारास नेहमीप्रमाणे ही शिक्षिका आपल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी बसमधून उतरली. आरोपी या ठिकाणी दबा धरुन बसला होता. काही मीटर पाठलाग करुन आरोपीनं मागून जाऊन बॉटलमधील पेट्रोल मुलीच्या अंगावर ओतलं आणि सोबत कापडाचा पेटवलेला बोळा तिच्या अंगावर फेकला आणि घटनास्थळावरुन ताबडतोब पळ काढला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पाणी ओतलं मात्र तोपर्यंत मुलगी ४० टक्के होरपळली होती. यावरुन कायद्याच्या धाकाचा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षिका असलेल्या महिलेवर पेट्रोल टाकुन जाळण्याची घडलेली घटना पाहिली तर या देशात कायदा नावाची गोष्ट शिल्लक आहे कि नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील कडक कायदे करण्याची गरज भासु लागली आहे. भारतीय संविधानामध्ये ज्याप्रमाणे इंडियन पेनल कोड अर्थात आयपीसीच्या कलमानुसार वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या शिक्षा ठरलेल्या आहेत, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात सुध्दा या शिक्षा ठरलेल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज हे शिक्षेबाबत एवढे कठोर होते. त्यांनी आपल्या नातलगांना, आप्तस्वकीयांना शिक्षेमध्ये अभय दिले नाही. रांझ्याच्या पाटलाला चौरंग कलम करण्याची शिक्षा महाराजांनी फर्मावल्याचे सर्वांना ज्ञात आहेत. आता समाजात घडणारे क्रौर्य पाहता महाराजांचे कायदे आज का असु नये असा प्रश्न साहजिकच सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहत नाही. सरकारी अधिकाऱ्याने जर काही कर्तव्यात कसूर केला तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्याची शिक्षा होती. महाराजांनी त्यांच्या पेशव्यांना बडतर्फ केले होते अशी कागदपत्रात नोंद आहे. जर महाराजांचा एखांदा अधिकारी भ्रष्टाचारात सापडला तर तात्काळ कार्यवाही केली जात असे. देश म्हणजेच राज्याशी द्रोह करणार्या व्यक्तीला मृत्युदंड ही शिक्षा दिली जात असे. मस्तक धडापासून वेगळं केलं जातं होतं. कधीकधी उजवा हात व डावा पाय कलम केला जातं असे. राज्याच्या मालमत्तेचे चोरी किंवा नुकसान केले असता एक हात कलम केला जात असे. जो व्यक्ती बलात्कार, अत्याचार करत असे त्या व्यक्ती:चे डोळे काढून हात व पाय कलम केले जात असत. प्रसंगी मृत्युदंड देखील दिला जात होता. आजमितीला या कडक कायद्याची गरज भासु लागली आहे. मंत्री असो वा मंत्र्याचा बाप असो... गुन्हा केला कडक शिक्षा झालीच पाहिजे. कशाला हव्यात कोर्टाच्या तारखा...ज्याने गुन्हा केलाय त्याला आठ दिवसाच्या आत शिक्षा द्या. महाराजांचे कायदे आज का लागु करु नये? काही लोकांना हे अत्यंत क्रुर वाटेल मग मानवाधिकाराच्या नावाने बोंबा ठोकायला सुरवात करतील. गुन्हेगार गुन्हा करतो त्यावेळी कुठे जातो तुमचा मानवाधिकार. पिडित व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार नसतो का? मग गुन्हेगारांना क्रुर शिक्षेच्या कायद्याच्या वेळी यांचा मानवाधिकार जागा होतो. 'ह्युमन राईट व्हायलेशन' च्या नावाने गळा काढणार्यांनो खरं तर पहिला तुमचा गळा आवळायला पाहिजे. आज समाजात लहान लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत. स्त्रियांवरील अमानुष आणि अघोरी अत्याचार पाहिले की वाटतं गुन्हेगाराला फाशीची शिक्षा फारच कमी आहे.  माणुसकीला काळीमा फासणाऱ्या बलात्काराच्या घटना, स्त्रियांवर अॅसिड फेकण्याच्या घटना, बलात्कारानंतर अंगावर काटा आणणाऱ्या हत्या अशा घटना आता राजरोसपणे ऐकायला मिळतात. आजची प्रशासन व्यवस्था अशा घटनांना रोखण्यास कुचकामी ठरत आहे. गोगलगायीच्या गतीने चालणारी न्यायालयीन व्यवस्था याला काही प्रमाणात कारणीभुत आहे. म्हणुन खर्या अर्थाने आज महाराजांच्या कायद्याची गरज भासु लागली आहे.

 


लेखक- दत्ता पवार (मो-९६५७६०८३३२)