जागतिक मराठी भाषा दिवस किंवा मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी बोलणार्या लोकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. मराठीतील प्रख्यात कवी आणि महाराष्ट्राचे भुषन विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असुन हा ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने यासाठी पुढाकार घेऊन कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेच्या योगदानाला सलाम करत या दिवसाला मराठी राजभाषा दिनाची मान्यता दिली. खरं तर ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतो किंवा जी आपली आई आहे, तिच्यासाठी खास दिवस वैगेरे असावा हे दुबळेपणाचं लक्षण असतं तरीसुद्धा संत ज्ञानेश्वर माऊलींनी गौरविलेल्या या 'अमृतासोबत पैजा जिंकणाऱ्या' पण तरीसुद्धा दुनियेच्या बाजारात आपल्याच लेकरांकडुन उपेक्षित झालेल्या 'माझिया मराठी'ची महत्ता तिच्याच लेकरांना समजण्यासाठी तिला 'दिन' असावा पण ती उपेक्षितांच्या भाऊगर्दीत ती 'दीन' न व्हावी हीच अपेक्षा आहे. या दिनामुळे जरी तिचे महत्त्व तिच्याच लेकरांपर्यंत पोहचत असेल तर ही अभिमानास्पद गोष्ट आहे. माय-मराठी आपली आई आहे आणि त्या आईनं आपल्याला अंगाखांद्यावर खेळवत मोठं केलं. एका आईनं जीवन दिलं असलं तरी या माय मराठीनं जगणं दिलं. तिच्या माध्यमातून आपण आपल्या जन्मदात्या आईशी पहिला संवाद साधला आहे. या मायमराठीला आपण आपल्या जन्मदात्या आईच्या गर्भात असल्यापासूनच शिकत असतो. म्हणुन जन्म झाल्यानंतर आपल्याला तिला शिकायची गरज भासत नाही कारण ती उपजत बुध्दी आपल्याकडं असते. तिनं आपल्यावर प्रेम केलं. जगाच्या इतिहासात ती खुपच समृध्द आहे. त्या आईची शिकल्या-सवरलेल्या मुलाला लाज वाटावी ही खुप मोठी शोकांतिका आहे. आपल्या मुलांना पैसे कमविण्याचे मशिन बनविण्याच्या नादात पालकांनी मुलांना संस्कारहीन इंग्रजीचे डोस पाजायला सुरवात केली. इंग्रजीत बोलणार्या आपल्या मुलांचा पालकांना प्रचंड अभिमान वाटु लागला आणि मराठी बोलणार्या मुलाची लाज वाटु लागली आणि तिच लाज नंतर पालकांचे गळे घोटु लागली कारण इंग्रजी आचरणाचा तो इंग्रजी मुलगा परदेशीवासी झाल्यानंतर गावी आपले आई-वडील स्वर्गवासी झाले तरी अंतिम संस्काराला येण्याची तसदीही घेत नाही तेव्हा खर्या अर्थाने मराठीयांच्या मातीतील लोकांना आपल्या मायमराठीचे महत्त्व पटते ही अभिमानाची बाब आहे. मराठी इतकी दुबळी नाही. ती समृध्द आणि सामर्थ्यशाली आहे. तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा पाहिजे हि सर्व मराठी भाषिक लोकांची मागणी आहे. "इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी" अशा प्रकारे मराठीचा उल्लेख माऊलींनी केला आहे आणि त्याची साक्ष आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने दिसल्याशिवाय राहत नाही. अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मराठी मातीतील प्रत्येकाला अभिमान असायला हवा आहे. आपल्या मराठी भाषेचा रंग, ढंग, मिजास वेगळा आहे. दर १५ किलोमीटरवर ही भाषा बदलते म्हणुन ती बहुरूपी आहे. विविध रूपे धारण केले तरी ती आपल्या मूळ रुपात पुन्हा येते. विचार, सौंदर्य, शब्दसामर्थ्य, गोडी हे मराठीचे शक्तिस्थळं आहेत. संतवाणी हा भाषेचा मानबिंदू आहे. हाच मोठेपणा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देईल. आज मराठीमध्ये मालवणी, आगरी, कोकणी, अहिराणी, मराठवाडी, आदिवासी, वर्हाडी इत्यादी प्रकारच्या भाषा आहेत. त्या सगळ्या विविध ढंगातुन आलेल्या आहेत म्हणून मराठी भाषा विविधांगी आहे. जगात लाखो भाषा बोलल्या जातात त्यात मराठी भाषेचे स्थान १७ व्या क्रमांकावर आहे. जगामध्ये १६ कोटी लोक मराठीतून बोलतात अशी आकडेवारी आहे. त्यामुळे मराठी भाषा काळाच्या ओघात संपुन जाईल असे समजण्याचे कारण नाही. कारण, जोपर्यंत मराठी संस्कृती आणि मराठीयेची नगरी जिवंत आहे, तोपर्यंत ही मराठी संपणार नाही उलट ती वाढत राहणार आहे. पण तिला वाढवणं आपल्याच हातात आहे. मराठी ही तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रामीण ढंगामुळं अधिक श्रीमंत झाली आहे. दुसर्या राज्यातील भाषांनाही तिने सामावून घेतले आहे. गुजराती, प्राकृत, संस्कृत, फ्रेंच, पोर्तुगीज, पर्शियन, अरेबिक या सर्वच भाषांमधील शब्द मराठीत असल्याचे आढळून आले आहे. अशा या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी संस्था यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. मराठीचा अंगीकार प्रत्येक मराठी माणसाने करायला हवा आणि ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असणार आहे. मराठी टिकविण्याचे प्रयत्न करणार्या लोकांना वाटते कि फक्त आम्हीच प्रयत्न करतो पण मराठी जिवित ठेवण्याचं खरं श्रेय जाते ते ग्रामीण भागातील मराठी बोलणार्या लोकांना जाते. ही मंडळी मराठी लोकपरंपरा जपतात, ती टिकवतात. लोकाचार, लोकव्यवहार, श्रद्धा, निष्ठा आणि भावना, भांडणंसुध्दा मराठीत करतात. कुसुमाग्रज म्हणतात, इंग्रज गेले आणि जाताना इंग्रजी ठेवून गेले. सर्व वरिष्ठ पातळीवर अधिकार्यांच्या मनातही इंग्रजी राहिली आहे.
कुसुमाग्रजांनी मराठीविषयीची खंतही व्यक्त केली होती. ‘देहाला बांधलेल्या दृश्य साखळदंडापेक्षा मनाला बांधणारे साखळदंड हे फार भक्कम असतात. नव्या युगाचे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य मराठीच्या ठायी आहे, कुसुमाग्रजांनी म्हटले होते की, आमचे कुणाशीही वैर नाही. मावशीच्या मायेने आमचे पालन करणार्या इंग्रजीशी तर मुळीच नाही. फक्त मावशीने आता आईच्या घराचा कब्जा आईच्या ताब्यात द्यावा, एवढीच मागणी आहे. त्यामुळे इंग्रजीच्या तिरस्काराचा प्रश्न नाही, तर मराठीच्या संवर्धनाचा आहे. इतका सुंदर विचार कुसुमाग्रजांनी दिला आहे. मराठी भाषेला विनम्र अभिवादन आणि मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
लेखक- दत्ता पवार