प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं 



प्रेम ही ईश्वराने मानवाला दिलेली खुप मोठी देणगी आहे आणि आयुष्यात खरं प्रेम एकदाच होतं. ईश्वराच्या मनात असते त्यावेळी अचानक त्याला 'ती' आवडु लागते आणि तिलाही 'तो' आवडु लागतो. आनंदाला पारावार राहत नाही. दुनियादारी, भानगडी तेल लावत जातात. आपण एकटेच स्वतःशीच हसतो. जगातले सर्व काही मिळाल्याची भावना तयार होते. एकमेकांशिवाय अजिबात करमत नाही. एकमेकांची खूप खूप काळजी घ्यावीशी वाटते. ह्रदयामध्ये धडधड नेहमीच जोरात चालू होते. एक दिवस बोलणे झाले नाही तरी चुटचुट लागुन राहते. दोघेही जेवल्याशिवाय घास जात नाही आणि दोघेही भेटल्याशिवाय आस जात नाही. तिचा हात हातात घेतल्याशिवाय राहवत नाही. तिचा चेहरा बघितल्याशिवाय चैन पडत नाही. झोप उडते. तिचा चेहरा चंद्रच जणु भासतो. तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना आपण कवी नसताना सुद्धा आपल्यातला कवी जागा होतो. मग त्या कवितेतून कधी ती चंद्र बनुन येते, कधी ती चांदण्या बनुन येते, कधी चंद्रावरचा डाग तिच्या गालावरचा तिळ बनुन येतो. कधी ती लाल गुलाबच फुल बनुन येते. कधी- कधी तर हदच होते आणि चक्क ती स्वप्नात येते. कोणाला ती जिलेबीसारखी गोड दिसायची म्हणून कोणी तिला जिलेबी म्हणायचं. कोणाला ती  गुलाबजाम इतकी गोड हसायची म्हणुन कोणी तिला  गुलाबजाम म्हणायचं. कधी अचानक ती बासुंदी भासते. कधी ती वडापावसारखी तिखट पण असते. ती जेवली तरच आपण जेवायचं. ती नाही जेवली तर आपण पण नाही जेवायचं, मग तिने लटक्या रागाने म्हणायचं की 'तु जेवणार आहेस की नाहीये' आणि मगच आपण जेवायचं. कारण तिला त्याचा आणि त्याला तिचा ध्यास लागलेला असतो. कधी कधी तिच्या घरी जी भाजी असते ती आपल्या ही घरी होते.. मग 'सेम-सेम' होतं. कधी कधी तिने मेथीची भाजी बनवली की आपली पण मेथीच असते. तिने गवार बनवली की आपली पण गवारच असते.. मग पुन्हा 'सेम - सेम' होतं. त्याच्या पण पुढं जाऊन काय होतं माहिती आहे? त्याच्या पुढे जाऊन आपल्याला तिच्या हातची भाजी भाकरी लई आवडते. आपण म्हणतो मला तुझ्या हातची भाजी खायची पण ती संधी आपल्याला मिळत नाही. कधी  मग सुरू होतं चोरुन-चोरुन भेटणं. तिला भेटायला आपण तब्बल दोन तास अगोदरच येवुन थांबायचं. 'ती' भेटल्यावर आताच आलोय असं सांगायचं. कधी-कधी तिनेही आपल्यासाठी एक तास आधी यायचं आणि भेटल्यावर आताच आलेय अस सांगायचं. बसस्थानकात अशा शेकडो बस तिच्यासाठी सोडायच्या पण तिला नाही सोडायचं. कधी भेट नाही झाली किंवा बोलणं नाही झालं तर उगाचच चुटचुट लागुन राहते . अश्रू अलगद बाहेर येतात. ज्या हाताचा उलटा पंजा डोळ्याला लावायची कधीच आवश्यकता पडली नाही, त्या दिवशी मात्र हाताच्या उलट्या पंजाने अश्रु दुर सारायची गरज खुप भासते. असं म्हटलं जातं की जुने ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही म्हणूनच ती आपल्या आयुष्यात आलेली असते. तिच्यासाठी आपण एकादशीचा उपवास धरायचा. मग तिने म्हणायचं माझ्यासाठी उपवास नको धरत जावुस. आपण मात्र शेकडो वर्षे उपवासाच व्रत पाळायचं. प्रेम इतकं नितांत असतं की तिने आठवण काढल्यानंतर आपल्याला उचकी लागतेच आणि आपण आठवण काढल्यानंतर तिला उचकी लागतेच. कधी कधी ठसका पण लागतो. मग नंतर आपण तिला विचारायचं की 'तु माझी आठवण काढली होतीस का?' तिने आश्चर्याने विचारायचं की, 'तुला कसं माहिती?' आपण म्हणायचं, 'उचकी लागली होती ना'. असं हे प्रेम असतं. मंगेश पाडगावकर यांनी म्हटल्याप्रमाणे 'तुमचं आमचं सेम सेम असतं'. ज्यांना आयुष्यात असं झालं त्यांनाच आयुष्यात खरं प्रेम झालेलं असतं. प्रेमाला जात, पात, धर्म, प्रांत, विवाहित, अविवाहित अशा मर्यादा नसतात.  अगदी सिमारेषा अर्थात 'लाईन आॅफ कंट्रोल' नसतात. म्हणुनच की काय प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे अर्थात भारतीय लोकांचे पाकिस्तान, बांगलादेशात पण प्रेम झाल्याची जिवंत उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. कारण प्रेम ही एक निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल अशी भेट आहे. ती एक पवित्र भावना आहे. प्रेम आयुष्यात एकदातरी करुन बघावं. कोणावर तरी एकदा मरुन बघावं. कोणासाठी तरी आज लवकर निघावं. प्रेम आयुष्यात एकदा तरी करून बघावं. खरं प्रेम आयुष्यात फक्त आणि फक्त एकदाच होतं. म्हणून आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात. तयार होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे आणि नात्यामागं काहीतरी कारण असत. नाहीतर करोडोंची आबादी असणार्‍या देशात याच व्यक्तीशी आपली ओळख का होते? कोण घडवुन आणतं हे? याचा मास्टर माईंड अर्थात सूत्रधार कोण?  याचे उत्तर या जगात कोणीही देऊ शकत नाही. 

   पण प्रेमाची दुसरी बाजू आपण बघत नाही. या जगात प्रत्येक जण खरं प्रेम करत नसतो.  प्रेम करणारे खुप असतात पण ते निभावणारे फारच थोडे मुलं आणि मुली या जगात आपल्याला आढळून येतात. प्रेमाच्या प्रांतात 'सोडून जाणे' हा विषयच नसतो. कारण जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते ती कधीच आपल्या आवडत्या व्यक्तीला दुःखाच्या सागरात सोडू जात नाही. जी व्यक्ती सोडून जाते तिने आपल्यावर खरं प्रेम केलेलं नसतं. ते एक नाटक असतं. ज्यात आपण फसले जातो आणि पर्यायाने बरबाद होतो. जिचं आपल्यावर खरं प्रेम असतं ती व्यक्ती कितीही संकटे आली तरी धरलेला हात कधीच सोडत नाही. जी व्यक्ती धरलेला हात सोडते ती धोकेबाज असते. अशावेळी खुप असह्य मनस्ताप, दुःख, यातना होतात. शेकडो सुर्य उगवले आणि मावळले तरी आठवणींचा एकच सुर्य आपल्या आयुष्यातुन मावळायचे नाव घेत नाही. एखादीनं एखाद्यांवर खुप प्रेम करावं. निदान तसं नाटक करावं. मग त्याला स्वप्न दाखवावीत. त्यानं तिच्यासाठी सर्व काही सोडायला तयार राहावं. तिनं भेटावं. त्यानही भेटावं.  त्यानं तिची वाट पाहावी. त्यानं तिच्यासाठी तासभर आधीच यावं. अन म्हणावं आताच आलोय. रात्रं-दिवस तिच्या आठवणीत जगावं. तिनं माञ मन भरल्यानंतर त्याला दुर ढकलावं. त्याच्यावर नाही ते आरोप करावेत. त्याला आरोपीच्या पिंजर्यात उभा करावं. त्याला गुन्हेगार ठरवावं. कुटुंबीयापुढे त्याची मानहानी करावी. त्याच्या ज्या नजरेनं प्रेम दिलं त्या नजरेला खाली पाहायला लावावं. त्याची माञ तिच्या आठवणीशिवाय दिवस आणि राञ न व्हावी आणि तिने माञ विसरून जावं यापेक्षा मोठा घात या जगात दुसरा कोणताही नसतो. कारण ती आनंदी राहते आणि तो जळत राहतो. अस थोड्याच लोकांच्या बाबतीत घडतं. हेच तिचं जगातील सर्वात मोठं पाप असतं. एवढं पाप करुनही तो तिचं सुखच मागतो. पण ईश्वराच्या दरबारात पापाला फळ ही असतातच. धोकेबाज व्यक्ती आपण न केलेल्या चुकांचे खापर आपल्यावर फोडते. आपली मानहानी करते. आपली बदनामी करते. आपल्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करते. यापेक्षा मोठे दुःख एखाद्याचा आयुष्यात दुसरे असु शकत नाही. ज्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावं किंवा निदान तसं नाटक करावं आणि जन्मभर साथ देण्याची शपथ घ्यावी. अचानक एक दिवस आपल्यावर बेछुट आरोप करावेत. स्वतःच्या कुटुंबियापुढे आपली मानहानी करावी, असे अनेक प्रसंग घडतात आणि  यापेक्षा मोठी वेदना नाही, म्हणून तरुण तरुणींनी प्रेम आंधळं असले तरी ते डोळसपणे करावं. कोणावर इतका विश्वास ठेवू नये की आपल्या मनात आत्महत्याच्या विचारांनी घर करावं. कोणामध्ये इतकं गुंतु नये की आपल्याला त्यातुन बाहेर यायचाच विसर पडावा. कोणावर इतके प्रेम करू नये की त्यानं आपल्या भावनांशी खेळुन निघुन जावं. ती सोडुन जाणारी व्यक्ती तिकडे खुश असते आणि आपण इकडे आपल्या आयुष्याची राखरांगोळी करतो.  त्यामुळे तरुण-तरुणींनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रेम करणारे खुप आहेत पण निभावणारे खुप कमी असतात. जो आपल्या प्रेमाला सोडुन जातो तो आयुष्यभर पश्चाताप करत राहतो. जाता जाता एकच...जी जीवाच्या पलीकडची नाती तयार होतात.  ती जीवाच्या पलीकडे जपावीत.

 


लेखक- दत्ता पवार