विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दुसर्‍या दिवशीही उत्साहात सुरू लातूरच्या व्हॉलिबॉल संघाची हिंगोली संघावर मात

लातूर,दि.८:- विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या आजच्या दुसर्‍या दिवशी जिल्हा क्रीडा संकुल मैदान, बॅडमिंटन हॉल, एस एम आर स्विमिंग व दयानंद महाविद्यालय मैदान याठिकाणी व्हॉलीबॉल, क्रिकेट टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, खोखो व स्विमिंग आदी स्पर्धां झाल्या. या स्पर्धांमध्ये औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली,नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याच्या विविध संघाने सहभाग घेतला. त्यातील विजयी झालेले संघ पुढीलप्रमाणे आहेत.
*बुद्धिबळ:-
क्रीडा स्पर्धेच्या आजच्या दुसर्‍या दिवशी बुद्धिबळ स्पर्धेत विजेते संघ पुढीलप्रमाणे-पुरुष:- प्रवीण चोपटे( बीड), प्रवीण बांगर (उस्मानाबाद), एसएस कुरेशी (परभणी). महिला:- धनश्री स्वामी (लातूर ),आम्रपाली अष्टेकर (औरंगाबाद), एस बी टरते( नांदेड).
*टेबल टेनिस:-
टेबल टेनिस दुहेरी महिला मध्ये औरंगाबाद संघाने लातूरच्या संघावर सरळ तीन सेट मध्ये मात केली. तर टेबल टेनिस चा महिला दुहेरीचा अंतिम सामना नांदेड विरुद्ध औरंगाबाद असा रंगला. या सामन्यात नांदेडच्या संघाने पहिला सेट गमावल्यानंतर ही सामन्यात वापसी करून पुढील तीन सेट जिंकून औरंगाबाद च्या महिला संघावर मात करून विजय संपादन केला.
*बॅडमिंटन:-
बॅडमिंटन च्या महिला एकेरी मध्ये नांदेड व हिंगोली या दरम्यान सामना होऊन नांदेड संघाने हिंगोलीच्या संघावर मात करून अंतिम सामन्यात धडक मारली तर बीड औरंगाबाद संघामध्ये बॅडमिंटन महिला एकेरीचा दुसरी सेमी फायनल झाली व यामध्ये औरंगाबाद संघाने बीड वर मात करून अंतिम सामन्यात धडक मारली.
व्हॉलीबॉल:-
 लातूर विरुद्ध हिंगोली दरम्यान हॉलीबॉल पुरुष संघाचा सेमी फायनल मुकाबला झाला यामध्ये लातूर संघाने हिंगोली मात करून अंतिम सामन्यात धडक मारली. हा सामना रोमहर्षक झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी या व्हॉलीबॉल सामन्याला उपस्थित राहून आनंद घेतला.
फूटबॉल:-
लातूर विरुद्ध जालना फुटबॉलचा कॉटर फायनल सामना अत्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात लातूर संघाने जालना संघावर एका गोल ने मात केली. तसेच पन्नास मीटर पोहणे या पुरुष एकेरी स्पर्धेत लातूरच्या संघाने विजय संपादन केला. त्याप्रमाणेच लातूर क्रिकेट संघाचा जालना क्रिकेट संघाकडून आज पराभव झाला.
सांस्कृतिक कार्यक्रम:
आजच्या स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून यातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण आहे तानाजी मालसुरे यांच्या वर आधारित असलेले गड आला पण सिंह गेला हे समूह नृत्य व त्यातील कलाकार असणार आहेत. या समूह नृत्यातील कलाकार लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, तहसीलदार राहुल पाटील, नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह विलास मलिशे, श्रीमती अनिता ढगे, वाहिद शेख, गणेश शिंनगिरे, शरण पत्री, चंद्रकांत फड, संदेश राठोड, संजय जाधव, ज्ञानेश्वर काळे व जयेश जगताप यांचा सहभाग असणार आहे.
 तसेच वैयक्तिक गीत गायना मध्ये अभिजीत अवधूते लाई वीना गई ते निभाई भी ना गई चे सादरीकरण करणार आहेत, तर वाळूत दंगला दारूत जिंगला हे नाटक काही लातूरचे कलाकार सादर करणार आहेत यासह इतरही सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी लातूरकरांसाठी असणार आहे.
*संसदीय कार्य राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार:-
  लातूर येथे अत्यंत उत्सहात व आनंदाच्या वातावरणात सुरू झालेल्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ दिनांक ९ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात दुपारी ४.३० वाजता होणार आहे. या बक्षीस वितरण समारंभास राज्याचे संसदीय कार्य, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन व रोजगार हमी योजना विभागाचे राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी या तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेते खेळाडू व विजेते संघांना मंत्रीमहोदयांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.