क्रीडा स्पर्धेतून सांघिक भावना वाढीस लागते - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

मुख्य कार्यकारी अधिकारी इटनकर यांच्या हस्ते विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन


लातूर, दि.7:- शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत, अशा स्पर्धांमधून अधिकारी व कर्मचारी  एकत्रित आल्याने सांघिक भावना वाढीस लागते व त्यामुळे शासनाने दिलेले प्रत्येक  उद्दिष्ट सांघिकपणे पूर्ण  करण्याचा प्रयत्न केला जातो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.


      जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दिनांक 7, 8 व 9 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन  झाले.  यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य काकासाहेब डोळे, विभागीय महसूल कार्यालयातील उपायुक्त पराग सोमण, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे यांच्यासह आठ ही जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले नव्हते, परंतु लातूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये सांघिकपणाची भावना वाढीस लागत असते. त्यामुळे येणाऱ्या विविध संकटांना सामोरे जाण्याची ताकदही वाढते व शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट एकत्रित पणे काम करून वेळेत व वेळेपूर्वी पूर्ण करण्याची क्षमता महसूल विभागात निर्माण झालेली आहे, असे त्यांनी सांगितले.


शासनाच्या सर्व  विभागात महसूल विभागाची एक वेगळी प्रतिभा व वेगळे आकर्षण आहे.  त्यामुळे शासनाचा या विभागावर विश्वास असून शासनाने दिलेले कोणतेही काम टाळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच शासनाचा प्रथम चेहरा हा महसूल विभाग असून महसूल कार्यालयात येणाऱ्या कोणत्याही अभ्यागतांना व सर्वसामान्य नागरिकांना चांगली वागणूक देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा कसोशीने प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.


   सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी कोणत्यातरी खेळायची आवड जोपासली पाहिजे व आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी रोजच्यारोज व्यायाम करावा आपण स्वतः आरोग्यदृष्ट्या सुदृढ असेल तरच कुटुंब सदृढ राहील व कुटुंब सुदृढ राहील तर कार्यालयात दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडता येईल. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांने आपले आरोग्य योग्य पद्धतीने सांभाळले पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.


लातूर जिल्ह्यात प्रत्येक मैदान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे याचा प्रत्यय या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून औरंगाबाद महसूल विभागातील आठही जिल्ह्यातील खेळाडूंना येणार आहे.  या स्पर्धेत औरंगाबाद, परभणी, जालना बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील जवळपास 1 हजार 400 खेळाडूंनी  विविध 14 क्रीडा प्रकारात व  99 इव्हेंट मध्ये सहभाग नोंदवलेला आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी खेळाचा आनंद  घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले. यावेळी विविध महसूल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


प्रारंभी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन विटणकर यांच्या हस्ते विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन  दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेच्या ध्वजाचे वंदन ही त्यांच्या हस्ते झाले. व स्पर्धेची मशाल ही प्रज्वलीत  करण्यात आली.


विभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी आठवी जिल्ह्यातील खेळाडूने परेड संचलन केले या पर्यटन संचलनाचे निरीक्षण पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य काकासाहेब डोळे यांनी केले यामध्ये प्रथम क्रमांक बीड, द्वितीय परभणी व तृतीय  क्रमांक लातूर परेड पथकाला मिळाला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित मान्यवर व खेळाडूंचे आभार निलंगा उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी मानले.