लातूर विभागीय मंडळातील परीक्षा सुरळीत सुरू ९१ हजार ५८४ विद्यार्थीनी दिली परिक्षा


लातूर/महेश चेंगटे
विद्यार्थी जीवनात महत्त्वाची समजली जाणारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली असून. या परीक्षेसाठी लातूर विभागीय मंडळातील ९१ हजार ५८४ विद्यार्थीनी आज २०७ केंद्रावर परिक्षा दिली.
 लातूर विभागीय मंडळात लातूर, नांदेड, उस्मानाबाद हे जिल्हे येत असून या विभागीय मंडळात एकूण २०७ केंद्र आहेत.या केंद्रावर आज परिक्षेचा पहिला पेपर विद्यार्थ्यांनी दिला.परिक्षाकेंद्रावर गैरप्रकार घडू नये म्हणून संवेदनशील परीक्षा केंद्राबरोबरच प्रत्येक केंद्रावर कडक नजर ठेवली होती. परीक्षेदरम्यान कुठलेही गैरप्रकार घडू नये म्हणून वेगवेगळ्या पथकांची परीक्षा केंद्रावर करडी नजर होती. जिल्हास्तरावर प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि निरंतर शिक्षण विभाग यांची तीन पथके, महिला पथक, उपशिक्षणाधिकारी पथक, जिल्हा शिक्षण संस्थेचे पथक, जिल्हाधिकर्‍यांच्या नियंत्रणाखालील दक्षता समिती आणि बैठे पथक अशी वेगवेगळे पथके गैरप्रकारांवर लक्ष ठेऊन असणार आहेत, अशी माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष संजय यादगिरे यांनी दिली.
 लातूरमधील २९० कनिष्ठ महाविद्यालयातील ३६,४४५ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यात विज्ञान शाखेच्या १५ हजार ७०९, कला शाखेच्या १२ हजार २७९, वाणिज्य शाखेच्या ५ हजार ५९८, व्होकेशनलच्या २ हजार ८५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नांदेडमधील २६१ कनिष्ठ महाविद्यालयातील ३८ हजार ७२१ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यात विज्ञान शाखेच्या १५ हजार ८९३, कला शाखेच्या १७ हजार ६८७, वाणिज्य शाखेच्या ४ हजार १२०, व्होकेशनलच्या १ हजार ०२१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उस्मानाबादमधील १४१ कनिष्ठ महाविद्यालयातील १६,४१८ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यात विज्ञान शाखेच्या ६ हजार ६१७, कला शाखेच्या ६ हजार ५६४, वाणिज्य शाखेच्या २ हजार १०४, व्होकेशनलच्या १ हजार १३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.