पाचवीच्या विद्यार्थ्यानी बनवले ड्रोन 
एमडीए आंतरराष्ट्रीय विद्यालयात कार्यशाळा संपन्न 


लातूर /प्रतिनिधी :एमडीए फाऊंडेशन द्वारा संचलित कोळपा येथील एमडीए आंतरराष्ट्रीय विद्यालयात आयोजित रोबोटिक्स व  ड्रोन मेकींग कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यानी या कार्यशाळेत सहभागी होत स्वतः रोबोट व ड्रोन बनवून त्याचे संचालनही केले . 

विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासासाठी एमडीए आंतरराष्ट्रीय विद्यालयाच्या वतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते . त्याचाच एक भाग म्हणून ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती .एमडीए आंतरराष्ट्रीय विद्यालयातील रोबोटिक्स व एरोनॉटिकल प्रयोगशाळेत आयोजित या कार्यशाळेस अमरावती येथील वैमानिकी अभियंता तथा शास्त्रज्ञ ऋषभ भुतडा यांनी मार्गदर्शन केले . ड्रोन व रोबोट बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे संचालन करण्याची माहितीही दिली . या कार्यशाळेत पाचवी , सहावी आणि सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानी स्वतः ड्रोन व रोबोट बनवले . पेरणी करणारा ड्रोन , मोबाईल व रिमोटद्वारे चालवला जाणारा ,कचरा जमा करणारा रोबोट विद्यार्थ्यानी तयार केला . त्याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले . सेन्सरचा वापर करून अंधांसाठी काठी आणि सोलार कॅप विद्यार्थ्यानी तयार केली . रोबोट व ड्रोन तयार करण्यासाठी आवश्यक प्रोग्रॅमिंग विद्यार्थ्यानी स्वतः केले . 

संचालक प्रा.ओमप्रकाश झुरुळे , प्राचार्या श्वेता गिल , उपप्राचार्या सी.विद्या यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमाचे संचलन सुषमा पुरी यांनी केले . ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील विज्ञान विभाग तसेच रोबोटिक्स व एरॉनॉटिक विभागाच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले .

या कार्यशाळेत सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.