बँक कर्मचाऱ्याची शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी,कर्जाचा हफ्ता चुकला

यवतमाळ : कर्ज वसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्याने शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. शेतीसाठी कर्ज काढून ट्रॅक्टर घेतला होता. या ट्रॅक्टरच्या कर्जाचे हफ्ते थकले होते. कर्जाचे हफ्ते वेळेवर जमा होत नसल्याने, हा कर्मचारी वसुलीसाठी गेला होता. त्यावेळी त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. यवतमाळमध्ये ही धक्कादायक घटना घडली.





गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. एका खासगी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीच्या मोवाडा इथे ही घटना घडली. घाटंजी पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्यानंतर महिलेने थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर सूत्रे फिरली. तक्रारदार महिलेने ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या कर्जाचे दोन हफ्ते फेडले.


पण तिसरा हफ्ता थकवला होता. त्यामुळे बँकेने वसुलीसाठी कर्मचाऱ्याला महिलेच्या घरी पाठवले होते. महिलेकडे त्यावेळी देण्यासाठी पैसे नव्हते, तिने आपली मजबुरी सांगितल्यानंतर आरोपीने पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याच्या वर्तनाने धक्का बसलेल्या महिलेने आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर आरोपीने लगेच तिथून पळ काढला. आरोपी बँक कर्मचाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.