करोना दहशत: तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद


लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तुळजाभवानी मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. करोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर बंद असताना नित्याचे धार्मिक विधी पूजाऱ्यांमार्फत केले जाणार असल्याची माहिती आहे.





गर्दीच्या ठिकाणाहून करोना व्हायरसचा फैलाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्य सरकारने चित्रपटगृह, मॉल, शाळा, जीम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तीर्थस्थळांवर लोक मोठया संख्येने दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे खबरदारी म्हणून तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.


देशात दररोज करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून रुग्णांच्या संख्येत सोमवारी वाढ झाली आहे. अजून चार जणांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ३७ वर पोहोचली आहे. राजेश टोपे यांनी रविवारी ९५ संशयितांना रुग्णालयांत दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती.