मित्रहो, ०१ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्वतंत्र झाला. आज या दिवसाला ६० वर्षे पूर्ण झाली. आतापर्यंत महाराष्ट्राने असंख्य प्रसंगात देशहितासाठी आपले मोलाचे योगदान दिले आहे. आजसुद्धा आपण सर्वजण एका महाभयंकर संकटाचा सामना करत आहोत. कोव्हीड - १९ अर्थात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. देशपातळीवर आणि राज्यामध्ये सुद्धा लॉकडाऊन आणि फिजीकल डिस्टंसींगच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना बाधितांची आकडेवारी जास्त असली तरी याला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. मुंबई, पूणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर अशा महानगरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. अशा महानगरांत दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार वाढतच आहे. "परदुःख शीतल असते" या उक्तीप्रमाणे जोपर्यंत या विषाणूमुळे स्वतःला किंवा जवळच्याच व्यक्तींना संसर्ग होत नाही तोपर्यंत काही उपटसुंभ लॉकडाऊनचे नियम मोडून जनतेचे आरोग्य धोक्यात आणतात. परिणामी विषाणूचा संसर्ग फैलाव वाढतच चालला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे आपल्याकडे या वातावरणात काही प्रमाणात हा विषाणू धीम्या गतीने प्रसारत आहे. परंतु येत्या दोन महिन्यांत यावर काही ठोस उपाययोजना नाही झाल्यास येणाऱ्या पावसाळ्यात जनतेचे आरोग्याचे प्रश्न अधिकच बिकट होतील असे वाटत आहे. पावसाळ्यात वातावरणातील हवामान बदलामुळे खोकला, ताप, सर्दी, पडसे इत्यादी आजार बळावतात. कोरोना विषाणूच्या आजारातही अशाच पद्धतीची लक्षणे आढळून येतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला झालेला सर्दी खोकला हा हवामान बदलामुळे की कोरोना विषाणू संसर्गामुळे अशी भीतिदायक परिस्थिती निर्माण होऊन महामारीची चिंता वाढतच राहिल. आजमितीस कोव्हीड - १९ विषाणूवर कोणतीच लस किंवा प्रतिबंधात्मक औषध नसल्याने जागतिक पातळीवर आरोग्यविषयक समस्या निर्माण झालेली आहे. कोरोनामुळे यापुर्वीचे सॉर्स, इबोला, कॅन्सर, एड्स, स्वाईन फ्लू असे महाभयंकर आजारसुद्धा आता क्षुल्लक भासत आहेत. इतर आजारांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत परंतु कोव्हीड - १९ साठी अद्यापपर्यंत कोणतेही औषध निर्माण झालेले नाही. हा थेट जीवाशी खेळ असल्याने मानवजातीवरील संकट अधिकच गडद होत चालले आहे. पुढील काही दिवस तरी यावर उपाय सापडत नसल्याने घरीच थांबा असा सल्ला दिला जात आहे.
महाराष्ट्रातील जनता २२ मार्चपासून घरातच असल्याने प्रत्येकांचीच आर्थिक परिस्थिती बिकट आहे. पुढील आणखीन काही काळ संघर्षांचाच दिसत आहे. जगरहाटी थांबलेली आहे. जोपर्यंत अर्थचक्र सुरू होणार नाही तोपर्यंत आपण सर्वजण स्तंभित राहणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी नेमके काय करायचे हे सांगणे कठीण आहे. पुढील काळातील संभाव्य धोके - घटना - घडामोडी - संधी-परिस्थितीचा अंदाज ओळखून सावध पावले टाकणे गरजेचे आहे. सावध ऐका पुढील हाका.. जगाचे गणित वेळीच ओळखा.. हेच सांगणे.
(विशेष संपादकीय...)