याची देही याची डोळा कसा पाहू विठु सावळा...?

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी म्हणजे महाराष्ट्रातील विठुरायाच्या भक्तांसाठी एक पर्वणीच असते. मूळ गाभा तसाच ठेवत काही बदलही या सोहळ्यात पाहायला मिळतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मधल्या काळात फेसबुक दिंडीने ही सोहळ्याचे जगभर दर्शन घडवले. परंंतू यंदा मात्र जागतिक महामारी कोरोनाच्या प्रादुर्भावाने या सोहळ्याला दृष्टच लागली असं म्हणणं वावग ठरणार नाही. कारण
याची देही याची डोळा
कसा पाहू विठु सावळा...?
पंढरीचा राजा माझा
उभा विठेवरी सादा भोळा...
पंढरीच्या वारी सोहळ्याचा
प्रत्येक वारकरी भुकेला
बा विठ्ठला यंदा तुझ्या वियोगाच्या
कशा सोसाव्या कळा...
अवघा भक्तगण तुझा
झाला कावरा व बावरा
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाचे दर्शन घडवणारी आणि सर्व जाती धर्मांना, पंथांना सामावून घेणारी वारी ही एक महान परंपरा आहे. सामाजिक एकात्मतेच दर्शन घडवणारी पंढरीची यंदाची वारी याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आसुलेल्या प्रत्येक भक्ताला अनुभवायला मिळणार नाही. पृथ्वीवर साक्षात स्वर्ग सुखाची अनुभूती देणारे वारीसारखे दुसरे कोणतेही सुख नाही. पंढरीच्या वारीचा हा अनुपम्य सुखसोहळा पाहीन मी याची देही याची डोळा अस म्हणत निघणारे लाखो वारकरी आपल्या सावळ्या विठुरायाच दर्शनार्थ प्रतिवर्ष पायी पंढरपूरपर्यंत वारीत चालत जातात. परंतू या सुखाला यावर्षी कोरोना महामारीच्या काळात कोरोना संक्रमणामुळे मुकावे लागत आहे. त्याशिवाय ज्यांना काही कामामुळे प्रत्यक्ष वारीत सामील होता येत नाही असे जगभरातील लाखो भाविक भक्त विठुरायाच्या ई-वारकरी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्याचा आनंद मिळवतात. परंतु यावर्षी केवळ संपूर्ण महाराष्ट्रातून संतांच्या येणार्‍या वार्‍या ह्या केवळ संतांच्या पादुकांच्या रुपानीच पंढपुरात दाखल होणार आहेत त्यामुळे नयनरम्य अशा वारीच्या सुखसोहळ्याला आतुरलेल्या प्रत्येक वारकर्‍याला यावर्षी दिंडीत पताका हातात घेऊन आनंदाने पंढरीच्या वाटेवर नाचता बागडता येणार नाही. प्रत्येक वर्षाप्रमाणे माझ्या बळीराजाला सुखाचं, समाधानाचं आणि काळ्या आईच्या  ओटीत मोकळ्या हाताना धनधान्य मागण्याचं भाग्य यंदा लाभणार नाही. समाजातील एक घटक हा सुख सोहळा पाहण्यापासून सालोंसाली वंचित असतो परंतू यावर्षी सर्व दृष्टी असलेले सुध्दा अंधजनासारखेच स्वतःला दृष्टिहीन समजणार अशी भावना यावर्षी वारकरी बांधवांना अनुभवास येत आहे. हजरो, लाखो विठ्ठलाच्या भाविक भक्तांना पालखी मार्गावर अन्नदान, पाणी वा अन्य सेवांच्या माध्यमातून आपला वर्षोंवर्षी सेवा भाव जोपासणार्‍या भक्तांना यंदा वारकर्‍यांच्या टाळ, मृदंगाच्या गजराची किंचीतही किनकिन ऐकायला मिळणार नाही. सुश्राव्या अशा अभंगाच्या गोडव्यात न्हालेला प्रत्येक वारकरी बेधुंद होऊन आपले वयमान, तनभान विसरुन पालखी सोहळ्यातील चक्रीभजनात चक्रावून जायचा तोच यंदा मात्र कोरोनाच्या चक्रव्युवहात हरपला आहे. एरवी आपल्या नातवाला सुध्दा कडेवर घेऊन मारुतीच्या पारापर्यंत जायचा कंटाळा करणारी आजी वारीत डोक्यावर वृंदावन घेऊन, हातात टाळ घेऊन विठुनामाच्या गजरात एक पाऊल टाकत पंढरीच्या चंद्रभागेत वर्षभराचे कष्ट वाहून टाकण्यासाठी आतुरलेले असतात. वर्णभेद, देहभेद विसरून सरसकट एकमेकांला माऊली माऊली म्हणत प्रत्येकाची आई होण्याचं भाग्य प्रदान करणारा हा सोहळा असतो, परंतू यंदा वर्षभराच्या संसारीक कष्टाला कोरोनाची झालर लागलेली आहे. प्रत्येकवर्षी चंद्रभागेत वाहून जाणारे हे सांसारीक कष्ट वारकर्‍याच्या तनमनाला अधिक कष्टी करत असल्याची खंत प्रत्येक भक्ताच्या मनात खदखदत आहे. ना शेतातल्या कामाची तमा, ना घर संसारतल्या उण्याधुन्याची खातरजमा, पंढरीच्या वाटेवर केवळ विठ्ठल नामाची कामना बाळगणार्‍या वारकरी सांप्रदायातील प्रत्येक घटकाला यावर्षी दुःखातिरेकाला सामोरे जावे लागत आहे. देभान विसरुन वयाची सिमा न बाळगता विठ्ठलनामाच्या ठेक्यावर फुगडी धरणारी वारकरी मंडळी यांदा घरातच बसून विठ्ठलाला स्मरणार आहे. देहू असो की, आळंदी, शेगाव असो वा पैठण अशा संपूर्ण संत जगतातून येणार्‍या पालख्या सासवड घाटातील अवघड वा अन्य वळणाच्या वाटेला पायाखाली आनंदाने घालत विठ्ठलाच्या भेटीला आतुरतेने जात असतात परंतू यावर्षी यासर्वच आनंदयात्रेला विरजन लागलेले आहे. यामुळे संपूर्ण आनंद सोहळ्याला मुकलेल्या सकल संत जगतातून आणि वारकरी संप्रादायाकडून पंढरपुरात विठेवर करकटेवर ठेऊन उभ्या असलेल्या विठ्ठुरायाला आर्त विनवनी असेल की बा पांडुरंगा, माझ्या सावळ्या विठ्ठला या कोरोना सारख्या महामारीला लयास लावून पुन्हा तुझ्या वाळवंटात आम्हाला येण्याचा मार्ग मोकळा कर, खुल्या मनाने, मोकळ्या हाताने, संपूर्ण देहाने तुझ्या नामात दंग होऊन टाळमृदांगाच्या गजराने लवकर तुझ्या अंशात लिन होण्याचं भाग्य आम्हाला दे...! एवढीच विनवनी करावीशी वाटतेय... विठ्ठल विठ्ठल जय हरी....