महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत मोलाचा वारसा जपणारी पंढरपुरची वारी. यंदा ती रद्द झाली आणि सकल महाराष्ट्रातील वारकरी, संतमहात्म्यांसाठी जणू मरण यातना देणारीच सल म्हणावी लागेल. दहरुपी पिंजर्यात असणार्या त्या विधात्याची आत्मरुपी अंशाला वर्षातून एकदा ममत्वाची जाणिव करुन देणारा प्रसंग म्हणा की उत्सव पण तो यावर्षी वारकरी आणि संताना कोरोना रोगामुळे परमात्म्यापासून विरक्त करणारा प्रसंग म्हणजे मर्मबंधातील खंतच म्हणावी लागेल. संसाररुपी मोहमायेत गुरफटलेला आणि तन, मना आणि धनाच्या विकारातून सकल पापाचा धनी ठरलेल्या नश्वर देहाला पावन करण्याचा उत्सव यावर्षी रद्द करण्यात आला त्यामुळे दुःखी आणि कष्टी झालेल्या वारकरी संतांची खंत आहे की, हा देह यावर्षी पारंपारिक वारीच्या रुपाने विठूरायाच्या भेटीला जाऊ शकत नाही. देहातील आत्म्याला परमात्मा देवाची भेट घालून देणार्या संतांच्या संगतीने पांडुरंगाला भेटायला ज्या संत वारकर्यांसोबत जाण्याचा स्वर्गसुखाच्या अनुभवाला मुकावं लागतय. प्रत्येक वर्षी देवाच्या भेटीला जाता ग्यानबा, तुकारामांचा जय घोष करत निघणारा प्रत्येक वारकरी आपल्या संसारातील सर्व सुख दुःखांचे गाठोडे बांधून घरीच ठेवतो आणि आत्मरुपी पांडुरंगाच्या चरणी लिन होण्यापूर्वी देहरुपाने वर्षातून किमान एकदा तरी त्याच्या चरणी अर्पण होण्यासाठी अक्षरशः हजारो, शेकडो किलोमिटर पायी चालून जातो. तोही देहभान विसरुन, जाती-धर्म, सामाजिक परंपरा, वांशिक चालीरिती या सर्व नश्वर गोष्टींना विसरुन एक माणूस म्हणून आपल्या सोबत आलेल्या इतर अन्य देहांना आपल्या माऊलीची (आई) उपमा देत वारीचा हा प्रवास करत असतो. पंढरीत जाणारा प्रत्येक वारकरी असो वा संत प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शण घेण्या अगोदर चोखोबाच्या समाधीचे दर्शन घेऊन नामदेव पायरीवर लिन होतो आणि पांडुरंगाच्या अस्तित्वाची अनुभूती करुन देणार्या या संतांच्या परवानगीने पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होतो. एरवी सांसारच्या मोहमायेत अडकलेला प्रत्येक वारकरी वारीच्या प्रवासात अक्षरशः साक्षात पांडुरंगच झालेला अनुभवनारा हा वारकरी यावर्षी त्याच्या भेटीला देहरुपी जाऊ शकत नसल्याची त्याच्या मनात असलेली खंत बोलून दाखवत आहे. कारण वर्षभर संसाररुपी मायाजालात राहून शेतकरी असणारा वारकरी वर्षानुवर्षे आपल्या शेतात विठू नामाच्या स्मरणाने काबाड कष्ट करुन मनुष्य जातीला जिवंत ठेवण्यासाठी सावता माळ्याच्या शिकवणीनुसार शुध्द बिजे काळ्या आईची कुशित पेरून त्यातून सकस अन्न उपजावे या प्रार्थनेसह पांडुरंगाच्या भेटीला शेतातील सर्व कामे उरकून येत असतो. अशा या वरकरी सांप्रदायाच्या वारीच्या परंपरेला यावर्षी खंड पडल्याने आत्मरुपी वारीत असलेला प्रत्येक वारकरी वा संत महात्मे देहरुपी यंदा आपल्या संसारी घरात कोरोनामुळे अडकून पडलेले आहेत याची खंत खरोखरच देवाला सुध्दा वाटत असावी. देवाकडे जायची वाट दाखवणारा प्रत्येक भक्त यावर्षी द्वंद्वास्तेत अडकून पडलाय. पंढरपुरच्या कानडा राजाला यंदा आमची आठवण येत नसावी का..? नाम्याची खिर चाखून, चोखोबाची गुरे राखणारा पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा यंदा आमच्यावर का रुसला हेच कळत नाही अशी भोळी भाबडी हाक प्रत्येक दुःखी भक्त देतोय. ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्याप्रसंगी मांमद्यासाठी घातलेल्या पक्वान्न रांधायला आणि पारण्यात बसलेल्या जेवनाच्या पंक्ती उठवणार्या विठ्ठल रुखमाईला आज या भक्तांची का किव आलेली नसावी...? अशी विलक्षण अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. वेदांनाही नाही कळला ज्याचा अंत ना पार, असा हा कर्नाटकी विठ्ठल यावर्षी आमच्यापासून का विमुक्त झाला असावा...? आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रासह आसपासच्या चार पाच राज्यातील एव्हाना देशातील अनेक भागातील भाविक भक्तांचा स्वर्ग सुखाची अनुभूती करुन देणारा सोहळा परंतू सामुहिक रित्या लाखोंच्या संख्येने एकाच पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने विश्वविक्रम करत अतिशय शिस्तीत, एकमेकांना सावरत, सांभाळत पंढरीच्या चंद्रभागेमध्ये न्हाऊन पावन होण्यासाठी येणार्या वारकरी भाविक भक्तांचा ओढा अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येत असतो. वारीच्या पायपिटीत कोणाकडून चूक झाली तर एकमेकांना क्षमा करत, एकमेकांना अंगाखांद्यावर घेऊन नाचत फुगडी खेळत, टाळ - मृदंगाच्या गरजात पंढरपुरात दाखल होत असतात. मग या वरीत विदर्भातील संतश्रेष्ठ गजानन महाराज शेगावीचा राणा म्हणवून घेत आपल्या बाळगोपाळांच्या मेळ्यासह पंढरीच्या वाळवंटात दाखल होतात, पैठणहून एकनाथांची, देहूहून तुकोबारायांची, आळंदीहून ज्ञानोबा माऊलींची पालखी प्रत्येक वर्षी सुमारे 1800 पालख्या पंढरपुरांत लाखो भाविक भक्तांना म्हणजेच वारकर्यांना घेऊन येतात. अशा या वरकरी सोहळ्याला यावर्षी कोरोनाच्या विळख्याने जखडून टाकले आहे. अशा या कोरोनाच्या विळख्यातून सकल जगाला मुक्त कर म्हणून प्रार्थना करत आत्मरुपी विविध संत महात्म्यांच्या पादुकांच्या वारीत सहभागी झालेल्या वारकर्यांनी प्रार्थना केली आहे. आणि आत्मरुपी संतांच्या पावलांच्या पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या सर्व संत वारकर्यांनी मर्मबंधत्मक खंत व्यक्त केली आहे. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या वारीला खोडा घालणार्या वैश्विक महामारीतून सकल जगताची मुक्ती करुन लवकरात लवकर बा विठ्ठला तुझ्या भेटीला आम्हाला येऊ दे अशी विनवणीही केली आहे.
वारकरी संतांची मर्मबंधातील खंत...?