बाप -डॉ. माधव हैबतकर 
                                                         

     उन, वारा नि थंडी यांची पर्वा न करता मुलांसाठी आयुष्यभर राबणारा एकमेव व्यक्ति म्हणजे बाप. आपल्या अस्तित्वाची ओळख म्हणजे बाप. प्रचंड सुखाचं, हक्काचं, अत्यंत आदरणीय नि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे बाप..! आपल्या जीवनाचा लेखाकार म्हणजे बाप. स्वत: हाल, अपेष्टा सहन करून मुलांच्या डोक्यावर मायेचं नि भवितव्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण छत्र उभारणारा एकमेव व्यक्ति म्हणजे बाप. अन्नदाता म्हणजे बाप, जीवनदाता म्हणजे बाप, भविष्याचा शिल्पकार म्हणजे बाप, सत्य आनंदाचा गुणाकार म्हणजे बाप, बोबडया बोलांना गोड बोल शिकविणारा बाप, आयुष्य चालविण्यासाठी धडपडणारा बाप, जीवनाची उभारणी करणारा बाप, सुखाची निद्रा प्राप्त करून देणारा बाप, मुलाचं नाव शाळेत टाकणारा बाप जणू आयुष्याचा शिल्पकारच. रात्रंदिन युध्दाचा प्रसंग झेलून मुलांवर आनंदाची सावली धरणारा बाप जगातल्या सा-याच सुखाचा इंद्रधनू आहे.

 

     बाप म्हणजे हिमालय, बाप म्हणजे सागर, बाप म्हणजे आभाळ, सूर्य नि चंद्र म्हणजे बाप, आभाळात भरून येणारा भलामोठा ढग म्हणजे बाप, जिंदगीची सोबत करणारा बाप जणू आयुष्यातला अनुपम अविष्कारच होय.

 

     धरतीवर पाठविलेलं नात्यांचं अनोख रुप म्हणजे बाप, आपल्या आयुष्याचा खरा आधार म्हणजे बाप जणू आयुष्यभराची पूंजीच होय. मुलांच्या जीवनासाठी सदैव परिश्रम घेणारा बाप मुलांसाठी जणू प्राणवायू होय. आयुष्याची भक्कम कार्यशाळा म्हणजे बाप. बाप म्हणजे प्रत्येक प्रश्नांच जणू उत्तरच होय.

 

     आपल्या आयुष्याचा डोळा म्हणजे बाप, आपल्या आयुष्याचा भक्कम हात म्हणजे बाप, भविष्याची वाटचाल म्हणजे बाप, आपल्या आयुष्याची महत्तम ऊर्जा म्हणजे बाप, मुलांचं काळीज म्हणजे बाप, आयुष्याचं ह्रदयस्पंदन म्हणजे बाप, विसाव्याचं परम श्रध्दाशील रुप म्हणजे बाप, सर्वांगीण प्रगतीचा आशीर्वाद म्हणजे बाप. स्वत:च्या आयुष्याचं वाळवंट करून मुलांच्या आयुष्याची बाग फुलविणारा बाप जणू नवनिर्माताच होय. यशाचा, सुखाचा नि सन्मानाचा धनी म्हणजे बाप जणू मुलांच्या आयुष्याचं सौंदर्यलेणच होय.

 

     प्रत्येक क्षणी मुलांच्या भविष्याचा विचार करणारा बाप मुलांसाठी हक्काची हिरवळच होय. मुलांच्या आयुष्यावर प्रेमाची सावली पांघरणारं उन्हातलं झाड म्हणजे बाप, मुलांसाठी वाट्टेल तेवढा  त्रास सहन करणारा बाप, त्यांचे हट्ट पुरविणारा बाप जणू एखाद्या चालू मशीनचा जीवंत असा पार्ट होय. घराचे छत होऊन जगणारा बाप नेहमीच जबाबदारीसोबत चालतो. आपल्या अपत्यांना जीवन शिकविणारा बाप कधीच आपल्या अपत्यांना खुरटे होऊ देत नाही. आभाळाची विशालता शिकविणारा बाप मुलांसाठी नेहमीच वंदनीय ठरतो.

 

     असं असलं तरी आज काहींना बाप ताप वाटतो आहे, असं वाटणं खुपच खेददायी आहे. बापाबाबत असे होऊ नये. बापाचे जीवन आनंददायी होत जावे आणि मुलांनीही बापासाठी जगत जावे..! बापाचे मोठेपण कायम ह्रदयात ठेवित जावे..!